मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा अन्यथा उद्यापासून पाणीही बंद करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री मुंबईत महत्वाची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीत मराठा आरक्षणावर तब्बल दीड तास चर्चा झाली.

मराठा आरक्षणावर आज मोठा निर्णय?

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा समाजाचा उद्रेक थांबवण्यासाठी राज्य सरकार दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याशी देखील चर्चा केल्याची माहिती आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या अद्यादेशाला मान्यता घेतली जाऊ शकते.

अधिक वाचा  व्वा! भाजपाच्या पठ्ठ्याने थेट मुख्यमंत्री केसीआर अन् सत्ताधारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांचाही केला पराभव

 आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

मराठा आरक्षणासाठी आज सरकारकडून सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आटोक्यात राहिल, तसेच विरोधीपक्षांकडून सरकारला सहकार्य मिळावं, तसंच विरोधी पक्षांनी सरकारला सरकार्य करावं, असं आवाहन या बैठकीत केलं जाणार आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा  मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा जड जाईल, जरांगेंचा इशारा 

या सरकारचे करायचे काय? महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली.त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही. शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण. एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले. पण शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.