मराठा आंदोलनाचा मुद्दा आता मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. यामुळे राजकीय वातावरणही तापलं आहे. आधी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये बस फोडण्यात आल्या, जाळण्यात आल्या आहेत. तर बीड, छत्रपती संभाजीनगर यासह अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. बीडमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
यापार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या अनेक भागात संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान बीड, धाराशिव, यानंतर आता संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून संचारबंदी करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अप्पर जिल्हादंडाधिकारी जनार्धन विधाते यांनी याबाबतचे आदेश रात्री काढले आहेत. जिल्ह्यात जाती-जातीत तणाव, मराठा-धनगर समाजाचे आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनास छत्रपती संभाजीनगरमधून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. ठिकठिकाणी लाक्षणिक उपोषण, ठिय्या आंदोलने सुरू आहेत. तर मराठा आरक्षणासाठी तुम्ही आवाज उठवा. मुख्यमंत्र्यांना फोन लावा, खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी मराठा आंदोलकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे केली आहे.