मुंबई :मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यातील एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सोलापूर विभागातील सर्व एसटी आगाराची वाहतूक पूर्ण बंद आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या आजपासून रद्द केल्या आहेत. याशिवाय संभाजीनगरमध्ये सोमवारी दुपारपासून बस सेवा ठप्प आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 1400 रोजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 160 बसेस मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या आहेत.

अधिक वाचा  अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगर दौरा अचानक रद्द, हे आहे कारण?

राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाची झळ एसटी बसेसला बसत आहे. पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांतून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे लालपरीची सेवा ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या नवीन स्लीपर बसेस परत बोलवण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरहून निघणाऱ्या आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

गेल्या 3-4 दिवसांपासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद
बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक अंशतः बंद आहे.
तसेच बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील 36 आगाराची वाहतूक पूर्णतः बंद आहे.
गेल्या चार दिवसांत राज्यभरात 80 पेक्षा जास्त एसटी बसेसची मोडतोड तर दोन एसटी बसेसची जाळपोळ
एसटी बसेसची मोडतोड, जाळपोळ झाल्याने अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
विभागातील वाहतूक पूर्णतः, अथवा अंशतः बंद असल्याने दररोज एसटीचा दोन ते अडीच कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे.

अधिक वाचा  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा गडचिरोली जिल्हा दौरा व कार्यक्रम तूर्त रद्द

बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 बस फेऱ्या रद्द

बुलढाणा जिल्ह्यातील विविध आगारातून 70 पेक्षा जास्त बस फेऱ्या या मराठवाड्यात होत असतात. मात्र परिवहन महामंडळाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या आजपासून रद्द केल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असून प्रवाशांचे देखील हाल होणार आहेत.

बीडमध्ये 70 बस फोडल्या

आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर हा जमाव बीडमध्ये बस स्थानकामध्ये पोहोचला. यावेळी बस स्टँडमध्ये 70 पेक्षा जास्त एसटी उभ्या होत्या. जमावाने या सगळ्या बस फोडल्या आहेत.