मुंबईः राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? अजित पवारांचा की शरद पवारांचा? हा वाद आता निवडणूक आयोगात आहे. शिवाय दोन्ही गटांकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. सोमवारी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम. या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनी ताकद लावण्यास सुरुवात केलीय.
त्यातच आता अजित पवार गट पाच राज्यांमध्ये निवडणुका लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. निवडणूक आयोगाचा निर्णय झाल्यास अजित पवार गट पाच राज्यातील काही मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं कळतंय. यासंदर्भात अधिकृत माहिती कळू शकलेली नाही.
दरम्यान, शुक्रवारी शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली असून आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा, यासाठी ही याचिका दाखल केलीय. दुसरीकडे अजित पवार गटानेही एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलीय. निवडणूक आयोगाच्या निर्णयाआगोदर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली तर पक्षचिन्हाबाबत कोर्टाने निर्णय देण्याआधी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, यासाठी अजित पवार गटाने कॅवेट दाखल केलं आहे.