टेम्भू सिंचन योजनेत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करावा,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई आर आर पाटील आजपासुन (साेमवार) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत. आमदार सुमनताई पाटील या त्यांच्यासमवेत मुलगा रोहित पाटील आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन उपोषण सुरू करणार आहेत. वारंवार मागणी करून ही प्रशासनाकडून पाण्यापासून वंचित असणा-या गावांचा टेम्भू योजनेत समावेश करण्यात येत नसल्याने हे आंदाेलन असणार आहे.

आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी राज्य सरकार विरोधात थेट बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतल्याने त्यांना ग्रामस्थांचा अधिकाधिक पाठींबा मिळू लागला आहे. जोपर्यंत टेम्भू योजनेत समावेश होत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार देखील पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

अधिक वाचा  लवकरच भारत चंद्रावर पाठवणार माणूस; पंतप्रधान मोदींनी दिली माहिती

दरम्यान समाज माध्यमातून हाेणा-या टिकेस उत्तर देताना युवा नेते राेहित पाटील म्हणाले जनता, ग्रामस्थ हे सूज्ञ आहेत. आर. आर. आबा यांच्यापासून आमचे कुटुंब राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करताे हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे या टिकेचे उत्तर जनताच विराेधकांना देईल असे पाटील यांनी स्पष्ट केले.