लोकसभा निवडणुकीच्या तयारीसोबतच विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पडझडीचा आढावा आजच्या बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. विशेष करून जळगावमध्ये शिवसेनेच्या चारही आमदारांनी ठाकरेंची साथ सोडल्याने जळगावमध्ये मोठे आव्हान ठाकरेंसमोर उभे राहिले आहे.
जळगावातील सर्व आमदार शिवसेनेच्या शिंदे गटासोबत गेल्याने ठाकरे गटाला या भागात खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. जळगाव ग्रामीणचे आ. गुलाबराव पाटील, चोपडाच्या आ. लता सोनावणे, पाचोराचे आ. किशोर पाटील, एरंडोलचे आ. चिमणराव पाटील हे सर्वजण मुख्यमंत्री शिंदेंसोबत आहेत. जळगावातील सर्वच्या सर्व आमदार शिंदे गटात गेल्याने या पक्षफोडीला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्याचप्रमाणे नगरमध्येही खासदार सुजय विखे पाटलांचा पराभव करून त्याजागी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी करा, असे आदेश ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी दिले.
ठाकरे गटाचे जळगावचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी उद्धव ठाकरेंसोबत प्रदीर्घ बैठक झाल्याची माहिती दिली. महाविकास आघाडी म्हणून आमच्या जागांवर निवडणूक लढवणार आहोत. जर काही कारणांमुळे महाविकास आघाडी होऊ शकली नाही तर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी असल्याचे भंगाळे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ‘मातोश्री’वर दररोज वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावले जात आहे.