मध्यप्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजप तयारीला लागली आहे. या अनुषंगाने भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. यादीमध्ये मध्यप्रदेशमध्ये 39 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून छत्तीसगडमधील 21 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मध्यप्रदेशात भाजपने ज्या ३९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, त्यापैकी तीन महिला असून यात धक्कादायक बाब म्हणजे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं नाव नाहीये.

चित्रकूट मतदारसंघातून भाजपने सुरेंद्र सिंह गहरवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. छतरपूर मतदारसंघातून भाजपने ललिता यादव यांना उमेदवारी दिली आहे. सुमावलीमधून अदल सिंग कंसाना आणि पिचोरमधून प्रीतम सिंग लोधी यांना संधी मिळाली आहे.

अधिक वाचा  ठाकरे गटात पुन्हा भूकंप? निवडून आलेले दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात

प्रीतम सिंह लोधी हे ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांच्या जवळचे मानले जातात. गोहड राखीव जागेवरून लालसिंग आर्य निवडणूक लढवणार आहेत. ते भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्षही आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस ओमप्रकाश धुर्वे यांना शाहपुरा येथून तिकीट देण्यात आले आहे.

दुसरीकडे छत्तीसगडमध्ये भाजपने २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या २१ पैकी ५ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने बस्तर या आदिवासी राखीव जागेवरून मणिराम कश्यप यांना तिकीट दिले आहे.सेफ सीट मोहला मानपूर येथून संजीव साहा यांना संधी मिळाली आहे. याशिवाय अभानपूरमधून इंद्रकुमार साहू, खैरागडमधून विक्रांत सिंह, कांकेरमधून आशाराम नेता यांना तिकीट देण्यात आले आहे.

अधिक वाचा  मराठा आरक्षण ‘गुड न्यूज’ घेऊन शिष्टमंडळात सराटीत; राज्य शासनाचा ‘पुन्हा खेळ’ आणि पुन्हा वादंगाची चिन्ह?

रामविचार नेताम यांना रामानुजगंजमधून तर शकुंतला सिंग पोर्थे यांना प्रतापपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रेम नगरमधून भुलनसिंग मरावी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. छत्तीसगडमधूनही माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.