बीड येथील सभेतून शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. “माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितलं. ठीक आहे तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचं आहे. पण निदान आयुष्यात ज्यांच्याकडून तुम्ही काही घेतलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवण्याचा प्रयत्न करा. असे जर केलं नाही तर लोक तुम्हाला योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तर राज्यात देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात असलेल्या रुग्णालयात लोकांचे जीव गेलं. लोकांना रुग्णालयात गेल्यावर त्यांना आधार मिळाले पाहिजे. पण सरकार यावर बघ्याची भूमिका घेत असल्याचे शरद पवार म्हणाले.
केंद्र सरकारवर देखील पवार यांनी टीका केली आहे. “समाजात अंतर निर्माण होईल याची खबरदारी आजच्या राज्यकर्त्यांकडून घेतली जात आहे. खतांची किंमत वाढली आहे. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. स्त्रियांची धिंड काढली जात आहे, पण भाजप गप्प आहे. मणिपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र यांनी जायची गरज होती. अधिवेशनात अविश्वास ठराव आल्यावर ते शेवटच्या काही मिनटात बोलले. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांना आवरायची वेळ आली आहे,” असे शरद पवार म्हणाले.