श्रीहरीकोटा : भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील आणखी एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 चं विक्रम लँडर प्रोप्युलुशन मॉडेलपासून वेगळं झालं आहे. आता इस्रोने ट्वीट करत चांद्रयान-3 संदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

चांद्रयान-3 लवकरच चंद्रावर उतरणार
इस्रोने माहिती देत सांगितलं आहे की, चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळं झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे चांद्रयान-3 चा आतापर्यंतचा प्रवास नियोजित वेळेत पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेकडे अवघ्या लजाचं लक्ष लागलं आहे.

अधिक वाचा  ….अखेर ठाकरे गटाची चाल यशस्वी? विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचा हा शासकिय परदेश दौराही रद्द

चांद्रयान-3 मोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा
इस्रोने याआधी सांगितलं होतं की, 17 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळा होईल. इस्रोने ट्वीट करत लिहिलं आहे की, ”लँडर मॉड्यूल (एलएम) म्हणाले की, ‘प्रवासासाठी धन्यवाद, मित्रा!’ लँडर मॉड्यूल (LM) प्रोपल्शन मॉड्यूल (PM) पासून यशस्वीरित्या वेगळं करण्यात आलं आहे. उद्या दुपारी 4 वाजता नियोजित डीबूस्टिंग होईल, त्यानंतर लँडर मॉड्यूल (LM) चंद्रापासून जवळच्या कक्षेत लँडिंगसाठी सेट करण्यात येईल.

विक्रम लँडर यशस्वीरित्या वेगळा

‘या’ दिवशी चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार?
चांद्रयान-3 चं 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरत्या प्रक्षेपण पार पडलं. 1 ऑगस्ट रोजी चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी प्रवास सुरु केला. चांद्रयान-3 द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. इस्रोने याआधी सांगितल्याप्रमाणे, मोहिमेने सर्व टप्पे नियोजित वेळेत पार केल्यास चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जर सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडलं तर चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.”