शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डीतील काकडी गावात आले आहेत. यावेळी त्यांनी सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून चांगले काम होत असल्याचं सांगितले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी श्रीशिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे नाव न घेता इशारा दिला. महामानवांच्या बाबत बेताल वक्तव्य सहन करणार नाही, असं ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ आई, शाहु महाराज, क्रांती ज्योती महात्मा ज्योतीराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहेत. यांचा आदर केलाच पाहिजे. त्यांबाबत कोण बेताल वक्तव्य करता कामा नये. याची दक्षता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत, असं ते म्हणाले.

अधिक वाचा  मांजरी खुर्द परिसरात गुन्हेगारी वाढ आणि सुविधांचा अभाव; नागरिक त्रस्त, पोलिस गप्प

शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना घरबसल्या लाभ मिळतोय याचा आनंद आहे. पुढेही हे काम सुरुच राहील. या योजनेमुळे लोकांना सरकारी कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे, योजनांची माहिती घेणे, कागदपत्र जमा करणं, कागदपत्र जमा करण्यासाठी कार्यलयात जावं लागणार नाही. या योजनेच्या माध्यमातून सरकार थेट गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे, असे ते म्हणाले.

शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, दिव्यांग यांना सहजासहजी लाभ मिळतोय. त्यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होतेय. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आम्ही एकजुटीने लोकांच्या कामासाठी झटणार आहोत.महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमाकांवर यावे. याकामात राज्यातील जनतेने आम्हाला साथ द्यावी, असं आवाहन त्यांनी केले. ज्यांनी या योजनेमध्ये योगदान दिले आहे त्यांचे आभार मानतो, असंही ते म्हणाले.

अधिक वाचा  जलजन्य आजार टाळण्यासाठी उच्च धोका असलेल्या भागातील पाण्याची तपासणी करा; आरोग्य विभागाचा पालिकेला आदेश

राज्याच्या समाजकारणात, सत्ताकारणात कोणत्याही भूमिकेत असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आहोत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी यापुढेही काम करत राहीन असा शब्द मी राज्यातील जनतेला देतो, असं पवार म्हणाले.