अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार असल्यामुळे दररोजच्या मार्गावरील एसटी बससेवा बंद करून नागरिकांना कार्यक्रमासाठी नेण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसहित सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला असून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.
पायी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या गाडीतून शाळेत सोडलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
“‘शासन आपल्या दारी’ या शासनाच्या अतिरंजित उपक्रमामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. आज सकाळी हे विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करताना दिसले. कारण सर्व एस टी बसेस मुख्यमंत्री महोदयांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यांच्याकडून कार्यक्रमासाठी गर्दी जमेना म्हणून खूप दुरून लोकं आणावी लागत आहेत, असे ऐकले. असो, त्यांना कार्यक्रमासाठी आणि भवितव्यासाठी शुभेच्छा!” असं कॅप्शन टाकून तनपुरे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज शिर्डी येथे होणार आहे. तर यासाठी संगमनेर येथून सुटणाऱ्या बसेस आणि मुक्कामी बसची सेवा कालपासून बंद करण्यात आली आहे. यासंदर्भातील नोटीस संगमनेर एसटी स्टँडवर लावण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी संगमनेर आगाराच्या जवळपास ६३ बस सोडण्यात आल्या आहेत.