राष्ट्रवादीतील बंडानंतर अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सोलापूरहून सांगोल्याला जाताना मंगळवेढ्यात तीन ठिकाणी स्वतंत्र सत्कार स्वीकारल्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीत गटबाजी असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे ‘राष्ट्रवादी पुन्हा‘ कशी उभारी घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्व. गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी सांगोल्याला जाताना कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव श्री. पवार यांनी मंगळवेढा येथे सत्कार स्वीकारण्याचे मान्य केले. मंगळवेढ्यात आल्यानंतर सुरुवातीला काँग्रेस पक्षाच्यावतीने शिवाजीराव काळुंगे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, पांडुरंग जावळे, मनोज माळी यांनी सत्कार केल्यानंतर त्याच ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अजित जगताप यांचे वडील रामचंद्र जगताप व लतीफ तांबोळी यांच्या मुलीने सत्कार केला.
त्यानंतर दामाजी चौक येथे अभिजीत पाटील यांनी सत्काराचे नियोजन केले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. आपली राजकीय ताकद दाखवून पवारांकडून तालुक्याच्या विकासासाठी त्यांच्यामागे ताकद देण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला देण्यात श्री. पाटील यशस्वी ठरले. त्यानंतर सोलापुरातील नियोजित जेवण टाळून त्यानिमित्ताने त्यांचे जुने सहकारी स्व रतनचंद शहा यांच्या वाड्यात भोजनाचा आस्वाद घेतला. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे राहुल शहा यांनी त्यांचा सत्कार केला.
या ठिकाणी अभिजित पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, जमीर इनामदार, सागर केसरे, रविराज मोहिते, बाबासाहेब पाटील, किसन गवळी, मुजफ्फर काझी, बजरंग ताड, सुरेश कट्टे आदी उपस्थित होते. या तीन ठिकाणी राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र सत्कार केल्यामुळे राष्ट्रवादीत गटबाजी असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे राजकीय मोळी कशी बांधणार असा सवालदेखील या निमित्ताने समोर येऊ लागला आहे.
त्या सत्काराचा आमचा संबंधच काय ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने राष्ट्रवादीत आम्ही शरद पवार यांच्यामागे स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र देऊन उभे राहिलो, त्यामुळे आमच्यात कुठल्याही प्रकारची गटबाजी नाही. ऐनवेळी जेवणाचे नियोजन ठरल्यामुळे राहुल शहांच्या घरी थांबावे लागले.
जे आमच्याबरोबर नाहीत त्यांनी स्वतंत्र सत्कार केला असेल. त्या सत्काराचा आमच्याशी संबंध नाही. मात्र अभिजीत पाटील व आम्ही सगळे शरद पवार यांना मानणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत. लवकरच तालुक्याला नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून पक्षाचे काम पुन्हा जोमाने करून पुन्हा उभारी घेवू, असा निर्धार मंगळवेढा राष्ट्रवादी शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी यांनी व्यक्त केला.