मी पुन्हा येईन… असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून व्यक्त केला होता. यावरुन आता शरद पवारांनी टीकास्त्र सोडलेय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. यावेळी शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले तर मुंबईमध्ये होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीबाबतही माहिती दिली. मोदींवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, ‘देशाचे चित्र मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही, त्यामुळं मी पुन्हा येईल असे कितीही सांगितलं तरी त्यांची अवस्था देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी होईल.’

मणिपूरजवळ चीन आहे, त्यामुळं अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घडणाऱ्या सर्व गोष्टी देशाच्या दृष्टीने घातक आहेत, 90 दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. अविश्वास ठरावाच्या दिवशी मणिपूरवर 2 मिनिटे बोलले आणि इतर विषयावर 2 तास बोलले. प्रधानमंत्र्यांनी मणिपूरमध्ये जावे लोकांना विश्वास द्यावा, हे त्यांना महत्वाचे वाटलं नाही. त्यापेक्षा निवडणुकांच्या तयारीची मीटिंग घेणं त्यांना महत्वाची वाटली. मणिपूरमध्येस्त्रियांची धिंड काढली जाते आणि मोदी सरकार पाहतेय, म्हणून जनमत मोदी सरकार विरोधात करायची इंडियाची भूमिका आहे. दिल्ली भाषणात त्यांनी या सगळ्यांचा उल्लेख करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेऊन मी पुन्हा येईल म्हणाले. आता फडणवीस आले मात्र कसे ? ते बघितले त्यामुळं आता हे पुन्हा कसे येतील बघावे लागेल. असो, आम्ही संघर्ष करू आणि माजबुतीने उभे राहू. जनमत तयार करून यांना धडा शिकवू, असे म्हणत शरद पवारांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

अधिक वाचा  एनडीएचे लोकही आमच्या संपर्कात एक छोटीशी गडबड सरकारला अडचणीत आणेल; राहुल गांधींचा गौप्यस्फोट

गेल्या काही दिवसांपासून मी राज्यात फिरतोय. लोक समर्थन करत आहेत, पाठिंबा देत आहेत. सांगोल्यात हजारो लोकांनी माझी गाडी अडवली, अनेक ठिकाणी लोक पुढं येत आहेत. समर्थन करत आहेत, आनंद आहे.. बीड सभेनंतर काही दिवसांनंतर पुन्हा बाहेर पडणार आहे, असे पवार म्हणाले.

देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्या भाजप आणि सहकाऱ्यांनी यांची भूमिका समाजातून एकवाक्यता संपवण्याची आहे. धर्म समाजामध्ये विभाजन कसे होईल, कटुता कशी वाढेल ? याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आम्ही देशपातळीवर 2 सभा घेतल्या. 6 राज्याचे मुख्यमंत्री त्यात होते, या व्यासपीठाला आम्ही इंडिया नाव दिले. याच इंडियाची बैठक मुंबईत आहे. मोदी सरकार विरोधात जनमत दाखवणे आणि पर्याय देणे यासाठी हा लढा आहे. समाजात जातीय उन्माद मोदी सरकार वाढवतेय. घेतलेले निर्णयामुळे कटुता वाढत चालली आहे. उदाहरण द्यायचे झाले तर इंग्लिश माध्यमांच्या शाळेत सीबीएसई शाळा कशा चालवायचा? हे केंद्र सरकर ठरवते. नव्या नियमांनुसार 14 ऑगस्ट 2023 हा दिवस फाळणी दिवस साजरा करावा असे सांगितले. यावेळी प्रचंड वेदनादायी गोष्टी झाल्या होत्या, कटुता निर्माण झाली होती. मात्र आता हा राग कटुता कमी होत असताना यांनी पुन्हा ते वर काढले आणि फाळणी दिवस साजरा करायला लावला. 2 समाजात कटुता येईल असे प्रदर्शन ठिकठिकाणी भरावे असे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत निषेध करण्याची भूमिका इंडिया घेणार आहे, असे पवार म्हणाले.

अधिक वाचा  मुख्यमंत्र्यांवर समाधानी नसून ते गुळगुळीत उत्तर देतात: हाके

निवडून आलेले सरकार कमजोर करण्याचे काम सुरु आहे. गोवा आणि मध्यप्रदेशमध्ये हे आपण पाहिलं आहे. महाराष्ट्रातही आपण हे सगळं पाहिलं आहे. प्रस्थापित सरकारला पाडणे हे काम मोदींच्या नेतृत्वात असलेल्या लोकांनी घेतले आहे, असा आरोप यावेळी पवारांनी केला. निवडणूक आयोगाने मला नोटीस दिली आहे. यामध्ये चिन्हांबाबत विचारणा केली. त्याचं उत्तर आम्ही देणार आहोत. मला चिन्ह चिंता नाही,फक्त सत्ताधरी सत्तेचा गैरवापर करताय हे योग्य नाही, असेही पवार म्हणाले.