ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा युतीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजपसोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यामुळे युती तुटली असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्याचसोबत शिवसेनेमुळे नाही तर मोदी-शाह यांच्यामुळे युती तुटली असल्याचे म्हणत त्यांनी युती तुटण्याचे खापर भाजपवर फोडलं आहे.
संजय राऊतांनी सांगितले की,’दिल्लीत एनडीएच्या महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये आम्ही युती तोडली नाही. शिवसेनेने तोडली असे सांगितले. त्याचे हे विधान असत्य आहे. मी आधीच सांगितलं की, २०१४ मध्ये भाजपने एका जागेवरून युती तोडली. ती युती तोडण्याची जबाबदारी पक्षाने खडसेंवर सोपवली होती. खडसेंनी याबाबत परवा स्पष्ट केलं होतं.’
‘२०१४ची युती मोदी आणि शाह यांच्या सूचनेवरून तुडली. तेव्हा मोदींची हवा होती. त्यांना स्वबळावर महाराष्ट्र जिंकायचा होता. त्यामुळे २५ वर्षांची युती त्यांनी तोडून फेकून दिली. २०१९ मध्येही त्यांनीच युती तोडली. २०१९ मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते. पण भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला.’ असे त्यांनी सांगितले.
तसंच, ‘भाजपने विचारलं मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण? आम्ही शिंदे यांचं नाव घेतलं. कारण ते विधीमंडळाचे नेते होते. पण भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. युती तुटण्याचं कारण शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद होतं.’, असा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, ‘युती करण्यासाठी अमित शाह मातोश्रीवर आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाली होती. ही चर्चा काय झाली हे वरळीतील पीसीमध्ये फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. युती, जागा वाटप आणि सत्ता वाटप यावर आमचं एकमत झालं आहे. सत्ता वाटप ५०-५० होईल असं फडणवीस म्हणाले होते.
संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे नेते माधव भंडारी यांनी बोलताना सांगितले की, संजय राऊत जे बोलतात त्या प्रत्येक वाक्यावर उत्तर देण्याची आमची काहीच जबाबदारी आणि बंधनं नाहीत. गुन्हेगारी करण्याची सवयी असणारी ही व्यक्ती आहे. त्यांना सकाळी उठल्यानंतर काही तरी बोलणं आणि जमलं तर खोटं बोलणं ही त्यांची सवयी आहे.’
तसंच, ‘जर एकनाथ शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री करायचे होते तर महाविकास आघाडी त्यांच्या शब्दानुसार चालत होती तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं. युती कोणी तोडली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कोणाच्या नावावर मत मागितली आणि नंतर जनतेचाच विश्वासघात केल्याहेही सर्वांना माहिती आहे.’, असं देखील माधव भंडारींनी सांगितलं.