याच महिन्यात, ऑगस्टमध्ये भारतीयांना 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते. 15 ऑगस्ट रोजी भारताने नियतीशी करार केला होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताला अवघ्या काही वर्षांत गुलामीच्या खाईत लोटले होते. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या या कंपनीने हळूहळू देशभरात हातपाय पसरवले. त्यानंतर एक एक संस्थान ताब्यात घेत, देशावर राज्य केले. 1857 मधील उठावानंतर या कंपनीऐवजी थेट ब्रिटिश महाराणीने भारताची सूत्रं हाती घेतली होती. पण काळाचा महिमा असा आहे की, आज तीच ईस्ट इंडिया कंपनी एका भारतीय उद्योजकाच्या ताब्यात आहे. तिची मालकी भारतीयाकडे आली आहे.
व्यापारासाठी कंपनी
16 व्या शतकात युरोपमधील अनेक देश तंत्रज्ञानाच्या जोरावर जगभर धडका मारत होते. काही इंग्रजी व्यापाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. या कंपनीचे मुख्य लक्ष भारतात येऊन व्यापार करणे हे होते. ही कंपनी 1600 शतकाच्या सुरुवातीला जेम्स लॅनकास्टर याच्या नेतृत्वात भारतात पोहचली.
ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळाला. थॉमस रो याने तत्कालीन मुघल बादशाह जहांगीर याच्याकडून त्यासाठी मंजूरी मिळवली. कंपनीने 1608 मध्ये सूरत येथे व्यापार सुरु केला. आंध्र प्रदेशातील मसूलीपट्टणममध्ये 1611 मध्ये पहिली वखार उघडली. त्यानंतर कंपनीने कोलकत्ता, सूरत सह इतर अनेक शहरात हातपाय पसरवले.
250 वर्षे केले राज्य
कंपनीने व्यापारासोबतच स्थानिक संस्थान, राजेशाहीत हस्तक्षेप सुरु केला. काही ठिकाणी थेट प्रशासन हातात घेतले. ईस्ट इंडिया कंपनीने फ्रान्स आणि पुर्तगाल या देशांना युद्धात हरवले. 1764 मधील बक्सरच्या युद्धाने ब्रिटिश ईस्ट कंपनीची पाळंमुळं घट्ट केली. 1857 पर्यंत कंपनीचे राज्य सुरु होते. त्यानंतर ब्रिटिश राजघराण्याकडे सत्ता गेली.
पूर्वेत ब्रिटिश सत्तेचा उदय
भारतात पाय घट्ट रोवल्यानंतर कंपनीने चीनला गुलाम केले. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने पूर्वेतील अनेक देशांना मांडलिक केले. त्यांची सत्ता पार दूरवर पोहचली. अनेक देश ब्रिटिश सत्तेने अंकित केले.
1857 मध्ये क्रांती
ब्रिटिशांच्या या एकाधिरशाहीला देशात अनेकदा आव्हान उभे ठाकले. 1857 मध्ये तर मोठी क्रांती झाली. तेव्हापासून ईस्टी इंडिया कंपनीचे वाईट दिवस सुरु झाले. ब्रिटिश राजघराण्याने या कंपनीला दिलेले विशेषाधिकार काढून घेतले. त्यामुळे कंपनीला स्वतःचे मालकीचे सैन्य ठेवण्याची परवानगी नाकारण्यात आली. या कंपनीचे अधिकार छाटण्यात आले.
अशी ताब्यात आली कंपनी
इतिहासाने या कंपनीला धडा शिकवला. कधी काळी जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या या कंपनीला 2010 मध्ये भारतीय उद्योजकाने खरेदी केले. संजीव मेहता यांनी ही कंपनी खरेदी केली. जवळपास 120 कोटी रुपयांत त्यांनी ही खरेदी केली होती.
आता काय करते काम
कधीकाळी व्यापारच नाही तर या कंपनीने अनेक देशांचा कारभार हाकला. रेल्वे, समुद्रावरील सत्ता, व्यापार, राजकीय पुढारपण, प्रत्येक क्षेत्रात या कंपनीची एकाधिकार होता. मेहता यांनी ही कंपनी खरेदी केल्यानंतर तिला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म केले. ही कंपनी सध्या चहा, चॉकलेट आणि कॉपीचे ऑनलाईन विक्री करते.