मुंबई : अभिनेता भरत जाधवने मुंबई सोडून कोल्हापूरला राहायला जाण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच मोठा धक्का दिला. भरत हा मूळचा कोल्हापूरचाच असून काही महिन्यांपूर्वी तो तिथे कुटुंबीयांसोबत राहायला गेला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यामागचं कारण सांगितलं. आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यानंतर अचानक मुंबई का सोडली आणि कोल्हापूरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला, याविषयी तो मोकळेपणे व्यक्त झाला.

मुंबई सोडण्याविषयी भरत म्हणाला, “मी आता मुंबई शहराकडे एक बिझनेस हब म्हणून पाहू लागलोय. हे शहर आता बिझनेस हब बनलं आहे. मी या दृष्टीने विचार यासाठी करत आहे कारण मला सध्या सगळ्या गोष्टींपासून मुक्तता हवी आहे. कोल्हापूरमध्ये माझं घर आहे आणि माझे कुटुंबीयसुद्धा इथेच माझ्यासोबत राहतात. कामाच्या निमित्ताने मी मुंबईत ये-जा करत राहीन. मी मुंबईतलं माझं घर विकलेलं नाही. त्यामुळे जेव्हा कधी शूट किंवा इतर काही काम असेल तेव्हा मी मुंबईत येईन.”

अधिक वाचा  शिवसेने ईतकीच मंत्रीपद राष्ट्रवादीला मिळण्याची मागणी; अजित पवारांच्या दिल्लीवारीचं नेमकं कारण आलं समोर

मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न विचारला असता तो पुढे म्हणाला, “माझ्या मते सध्याच्या आयुष्यात श्वास घेण्यासाठी मोकळा क्षण खूप आवश्यक आहे. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी मिळून कोल्हापूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. मला इथे राहायला आवडतं. इथली हवा ताजी आहे. मला मुंबईसुद्धा आवडते, पण आता तिथूनच काम केलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. सध्या मी फक्त कामानिमित्त मुंबईला येतो आणि काम झाल्यावर पुन्हा कोल्हापूरला येतो.”

भरत जाधवने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेत त्याने काम केलं. याशिवाय नाटकानिमित्त त्याचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दौरे होत असतात.