काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदात रस नाही, त्यामुळे संघटनेत एखाद पद मिळावं अशी मागणी केली होती. अजित पवार यांच्या मगाणीनंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपद हवं आहे का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपद बदललं जाणार असल्याची देखील चर्चा होती. आता यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी देखील आपल्याला संघटनेत एखादी जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत काहीही माहिती नाही. मी पाटण्याला गेले होते, त्यानंतर दिल्लीला गेले. आता पक्षाचे नेते पदाधिकारी कामात व्यस्त आहेत. जेव्हा निर्णय होईल तेव्हा कळेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया
यावेळी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यावर बोलताना त्यांनी खोचक टोला लगावला आहे. आधी विस्तार तर होऊ द्या, दर तीन दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या बातम्या ऐकत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांची प्रतिक्रिया-
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील अजित पवार यांच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली होती. पक्षात मी एकटा निर्णय घेत नाही. पक्षाचे सर्व पदाधिकारी मिळून अजित पवार यांच्या मागणीवर निर्णय घेऊ असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.