रोममध्ये म्हणजे व्हॅटिकन सिटीमध्ये २५ मार्च २०२३ ला मुंबईचे सहाय्यक बिशप जॉन रॉड्रीग्स यांची पुण्याचे बिशप म्हणून जाहीर घोषणा झाली. त्यानंतर लगेचच पुण्यातील बहुतेक सगळ्या चर्चेसमध्ये त्या संध्याकाळी चर्चबेलचा घंटानाद झाला. आमच्या चर्चमध्ये त्या शनिवारी संध्याकाळी रविवारच्या पुर्वसंध्येच्या आधी मी हा घंटानाद ऐकला आणि चर्च सुटल्यानंतर फेसबुक पाहून त्या अचानक झालेल्या चर्चबेलच्या घंटानादाचे कारण समजले. .

त्यानंतर यथावकाश शपथविधीची तारीख मुक्रर झाली अन काल संध्याकाळी हा नूतन बिशपांच्या पदग्रहणाचा विधी पार पडला. बिशप शपथविधीचा सोहळा दुर्मिळ असतो, त्याहून दुर्मिळ असतो कार्डिनलांचा अभिषेक विधी. हा विधी अर्थातच पोपमहाशय फक्त व्हॅटिकन सिटीतच करतात आणि त्यावेळी जगभरातले दहावीस नवनिर्वाचित कार्डिनल पोपसमोर गुडघे टेकून आपली रेड कॅप पोपमहाशयांकडून स्वीकारतात.

या लाल टोपीधारी कार्डिनल लोकांमधून ऐंशी वर्षाखालील असणाऱ्या एकाची मग नवे पोप म्हणून निवड होत असते, यावरुन कार्डिनल पद किती महत्त्वाचे असते हे लक्षात येईल. मुंबईचे कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस हे भारतातील कॅथॉलिक चर्चचे सर्वात ज्येष्ठ धर्माधिकारी, भारतातील सहा कार्डिनल्सपैकी एक आणि जागतिक चर्चमध्ये पोप फ्रान्सिस यांचे एक महत्त्वाचे सल्लागार आहेत.

अधिक वाचा  मोदी 3.0 सरकारच्या पहिल्याच दिवशी शेतकरी सन्मान निधीचा सतरावा हप्ता जारी, चेक करा तुमचा बॅलेन्स

कालच्या बिशपांच्या अभिषेक विधीला मी हजर होतो, त्याआधी चौदा वर्षांपूर्वी बिशप थॉमस डाबरे यांचा शपथविधी मी पाहिला होता. कालच्या या दीक्षाविधीची ही काही क्षणचित्रे…

सर्वप्रथम पोप फ्रान्सिस यांनी काढलेल्या नेमणुकीच्या आदेशाचे Papal Bull चे वाचन झाले, त्यावर मावळत्या, नवनिर्वाचित बिशपांच्या आणि पौराहित्य करणाऱ्या कार्डिनल यांच्या सह्या झाल्या. त्यानंतर कार्डिनल ग्रेशियस नवनिर्वाचित बिशपांना विधीपुर्वक त्यांच्या गादीकडे नेत होते तेव्हा सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रलची चर्चबेल वाजत होती, त्या समारंभात कितीजणांनी हा घंटानाद ऐकला ते माहित नाही, काही क्षण मी मात्र ऐकला.

चर्चपरंपरेनुसार सर्व कार्यक्रम वेळेत पार पडला. बरोबर सहा वाजता लोक कॅथेड्रल मध्ये बसले होते आणि मुख्य प्रवेशद्वारापाशी दोन कार्डिनल, मावळते आणि उगवते बिशप्स, पोप यांचे दिल्लीतील राजदूत, वगैरे रांगेत उभे होते. या संपूर्ण कार्यक्रमाची रंगीत तालीम वगैरे काही आठवडे चालू होती. विविध समित्या होत्या. पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था, प्रार्थना विधी आणि अर्थातच प्रसार माध्यमे (त्यात मला गोवण्यात आले!) या सर्व बाबींची सूत्रे हाताळत होते पुणे डायोसिस चे व्हिकर जनरल फादर माल्कम सिकवेरा…

अधिक वाचा  पेरिविंकलचा विराज मनोज जरांगेंच्या भूमिकेत; “आम्ही जरांगे” या चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात 14 जून रोजी प्रदर्शित होणार

पुण्यात बदली होऊन येण्याआधी वसईचे बिशप थॉमस डाबरे हे मराठी संत वाङमयाचे अभ्यासक म्हणून पुऱ्या महाराष्ट्राला परिचित होते. वय अवघे ५६ वर्षांचे असणाऱ्या नूतन बिशप रॉड्रिग्स यांची पाटी त्या तुलनेत तशी कोरी आहे आणि त्यामुळे सर्वांकडून अपेक्षाही खूप आहेत. मिस्साविधी बहुभाषिक होता, पहिले वाचन मराठीत झाले, काही प्रार्थना हिंदीत झाल्या.

गोव्याचे कार्डिनल फिलिप नेरी फेराव हे भारतातील सर्वांत अलीकडेच नेमणूक झालेले धर्माधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय काथोलिक असलेले मात्र वेगळी धर्मविधी असणारे Cyrian वगैरे बिशप आपापल्या आगळ्यावेगळ्या पेहरावांत हजर होते. माझ्यासह तिथे जमलेल्या अनेकांनी नव्या बिशपांना पहिल्यादाच पाहिले, ऐकले. आपल्या प्रवचनात बिशपांनी अचानक मराठीत बोलणे सुरु केले आणि जमलेल्या अनेक लोकांना एक सुखद धक्का दिला.

अधिक वाचा  आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही, शरद पवारांचा पीएम मोदींवर हल्लाबोल

दिडशे वर्षांचा इतिहास असलेल्या पुणे धर्मप्रांताचे बिशप थॉमस डाबरे तसे पहिलेच मराठीभाषिक प्रमुख होते. पहिले दोन बिशप तर जर्मन होते. मात्र त्यापैकी दुसरे आर्चबिशप हेन्री डोरिंग मराठीत लिहीत, बोलत असत. ब्रिटिश धर्मगुरु फादर थॉमस स्टीफन्स यांच्या सतराव्या शतकातील रोमन लिपीत असलेल्या `ख्रिस्तपुराणा’च्या काही भागांचे त्यांनी पहिल्यांदा देवनागरीत लिप्यांतर केले. तर पुणे बिशपांच्या गादीचा इतिहास असा आहे. त्यामुळे नूतन बिशपांकडून फार अपेक्षा आहेत, निवृत्त बिशप थॉमस डाबरे यांना त्यांच्या उत्तम कारकिर्दीबद्दल धन्यवाद आणि नूतन बिशपांना शुभेच्छा