शंभर कोटी रूपयांच्या वसुलीच्या आरोपाखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल चौदा महिने तुरूंगात राहावे लागले. या काळात आलेले अनुभव शब्दबद्ध करून ते पुस्तक रूपात वाचकांसमोर आणण्याची तयारी देशमुख यांनी केली आहे. या काळात तुरूंगात आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहे. येत्या काही दिवसात पुस्तकाला अंतीम रूप देण्यात येणार असून लवकरच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. विशेष म्हणजे त्यांनी या पुस्तकाचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे. लवकरच नाव जाहीर करू, असे त्यांनी सांगितले.
अटकेच्या चौदा महिन्यांच्या काळात देशमुख यांना मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. या चौदा महिन्यात खूप काही घडले. सरकारच्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देशमुख यांनी केला. ते म्हणाले, ‘‘पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला ज्या बराक क्रमांक बारामध्ये ठेवण्यात आले, त्या बराकमध्ये तब्बल चौदा महिने काढावे लागले.
एका खोट्या गुन्ह्यात बनाव करून मला अडकविण्यात आले. कुटुंबातील लहान मुलांनादेखील चौकशीतून सोडण्यात आले नाही. मात्र, या काळात मी मानसिक व शारिरीकदृष्टया खंबीर राहण्याचा प्रयत्न केला. जेलमधील जेवण करत होतो तरी रोजच्या रोज व्यायाम करून तब्बेत चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. रोज किमान एक तास व्यायाम करीत होतो.
देशमुख म्हणाले, ‘‘तुरूंगातील चौदा महिन्यांच्या काळात काही महिने नवाब मलिक व खासदार संजय राऊत यांची भेट होत असे. राऊत यांच्याशी चर्चा होत असे. ते रोज काहितरी लिहित असत. ते मलाही लिहिण्याचा आग्रह करू लागले. त्यामुळे मी खूप वाचले आणि लिहायला सुरवात केली. या लेखनातून एक चांगले पुस्तक तयार झाले. पुस्तकाचे नाव व त्यातील तपशील यथावकाळ कळेलच.’’
एका खोट्या आरोपाखाली मला अटक करण्यात आली. चौदा महिने विनाकरण तुरूंगात राहावे लागले याचे वाईट वाटते. मात्र, या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते आणि स्वत:शरद पवार यांनी माझ्या कुटुंबाची काळजी घेतली हे मी कधी विसरू शकणार नाही, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.
तुरूंगातून बाहेर आल्यानंतर मी मतदारसंघाकडे पूर्ण लक्ष दिले आहे. मतदारसंघातील जनतेचा मला प्रचंड पाठिंबा आहे. मी तुरूंगात असतानादेखील मतदारसंघातील लोक त्यांच्यापरीने माझी काळजी करत होते. विचारपूस करीत होते. लोकांचे हे ऋण मी कधीच विसरणार नाही, असे देशमुख यांनी सांगितले.