मुंबईः राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार येऊन ११ महिने झाले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सत्तापक्षातील अनेक आमदारांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली तरीही विस्तार रखडलेलाच आहे. आज मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, राज्य सरकार ७५ हजार नोकऱ्या देणार आहे. त्या अनुषंगाने पावलं उचलली जात आहे. सरकार शब्द पाळणार आहे.
याशिवाय कौशल्य विकासाच्या माध्यमातन दोन लाख लोकांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा विभाग अनेक कंपन्यांशी समन्वय साधत असून तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगार देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या माध्यमातून दोन लाख लोकांना नोकऱ्या मिळणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मागच्या ११ महिन्यांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विस्तार होईल, असं बोललं जात होतं. मात्र अद्यापही सरकारला मुहूर्त सापडलेला नाही. आज मात्र मुख्यमंत्र्यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं विधान केलं आहे.