कर्नाटकमध्ये काँग्रेसने १३५ जागा जिंकून एकहाती स्थापन केली. सिद्धरामाया यांनी मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर मात्र शिवकुमार यांनी खूश नसल्याचे विधान केले आहे. ते बंगळूरु येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
यावेळी शिवकुमार यांनी निकालानंतर मी अजिबात खूश नसल्याचे सांगितले. शिवकुमार म्हणाले की, “मी तुम्हा सर्वांना कबुली देतो की कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या 135 जागांवर मी खूश नाही. काँग्रेसने आतापासून प्रत्येक निवडणुकीत चांगली कामगिरी करावी. यासोबतच पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली होण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी आपल्या सर्वांना कठोर परिश्रम करावे लागतील. ही फक्त सुरुवात आहे, फक्त एका विजयानंतर आत्मसंतुष्ट होऊ नका.”
कर्नाटकात लोकसभेच्या 28 जागा
कर्नाटकात लोकसभेच्या 28 जागा आहेत. लोकसभेच्या जागांबाबतीत कर्नाटक देशातील सातवे मोठे राज्य आहे. त्यामुळे येथील विजय किंवा पराभवाचा पक्षाच्या कामगिरीवर मोठा परिणाम होतो. 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्नाटकमध्ये (BJP) भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस आणि जेडीएसला प्रत्येकी एकच जागा जिंकता आली.
पहिल्याच बैठकीत आश्वासने पूर्ण
दरम्यान, शनिवारी (ता. २०) कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेससोबतच अनेक विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सिद्धरामय्या यांनी निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने लवकरच पूर्ण करण्याचे बोलले. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच पाचही आश्वासने पूर्ण करण्याचे आदेश जारी केल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्षाचे अनेक नेते उपस्थित
कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमारही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. त्यांची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा यांच्यासह विविध राज्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान काँग्रेसने दिलेल्या पाचही आश्वासने पूर्ण करण्याची हमी दिली.