पुणे : राज्यातील लोकसभेच्या एकूण जागांचे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अद्याप वाटप झालेले नाही. या जागा वाटपाबाबत सामंजस्याने मार्ग काढण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता.१९) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या जागा वाटपाबाबत भूमिका ही त्यांच्या पक्षाची असू शकते, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या महाअधिवेशन सभेच्या उद्घाटनासाठी पवार पुण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेने जिंकलेल्या सर्व जागांवर दावा केला आहे. याबाबत पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

अधिक वाचा  पुणे मेट्रोच्या लोखंडी साहित्याचा ढीग अजूनही मुठा नदीपात्रात; खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाही हलगर्जीपणा

पवार पुढे म्हणाले, “कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे या देशाला आता राजकीय सत्ताबदल हवा आहे, असे दिसू लागले आहे. म्हणून आम्ही सर्व समविचारी पक्षांनी एकञ यावे आणि लोकांना पर्याय द्यावा, असा विचार करत आहोत. त्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही हीच इच्छा व्यक्त केली आहे. लवकरच आम्ही सर्व एकञ भेटणार आहोत.

‘कर्नाटक सरकारच्या शपथविधीला जाणार’

दरम्यान, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत तेथील जनतेने कॉंग्रेसला एकहाती सत्ता दिली आहे. या सरकारच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

अधिक वाचा  धाराशिव हादरलं ! ऑनलाईन जुगार कर्जबाजारी झाला; तरुणाने आधी पत्नी आणि मुलाला संपविले अन मग स्वत:ही…