पुणे शहरातील रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण, त्यामुळे उद्‌भवणारे वादाचे प्रसंग आणि अपघाताच्या घटना टाळण्यासाठी महापालिकेने यापुर्वीच घोषित केल्याप्रमाणे शहराच्या वेगवेगळ्या भागात सात ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार भरविण्यास परवानगी देण्यात येणार आहे. बाणेर, आंबेगाव, धानोरी, कळस, खराडी आदी सात ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार भरविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. हडपसर परिसरता कांदे विक्री करणाऱ्या एका शेतकऱ्याचा टेम्पो महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त करुन त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली होती.

त्याविरुद्ध माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महापालिकेसमोर कांदा विक्री आंदोलन केले होते. संबंधित आंदोलानची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गांभीर्याने दखल घेत शहरातील नागरीकांना ताजा भाजीपाला, फळे मिळावीत आणि शेतकऱ्यांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास न होता कायदेशील शेतीमाल विक्री करण्याची परवानगी मिळावी, यासाठी शेतकरी आठवडे बाजार सुरु करण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार, महापालिकेने शेतकरी आठवडे बाजारास मान्यता दिली आहे.

अधिक वाचा  पुण्यात सततच्या पावसामुळे पाणी साचले, वाहतूक कोलमडली; शहर ठप्प

राज्य शासनाचा कृषी विभागामार्फत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यात येत आहे. या प्रकल्प अंतर्गत महापालिकेकडून “अर्बन फुड पायलट हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे, या पथदर्शी प्रकल्पातील शेतकरी आठवडे बाजारांच्या दर्जामध्ये सुधारणा करुन, नागरीकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला दर मिळावा, यासाठी शेतकरी आठवडे बाजारास प्राधान्य देण्यात आले आहे.

महापालिकेच्या हद्दीत ही आहेत ठिकाणं….
बाणेर ओटा मार्केट,
सन सिटी ओटा मार्केट,
आंबेगाव बुद्रुक ओटा मार्केट,
खराडी ओटा मार्केट,
वडगाव शेरी येथील पुण्यनगरी ओटा मार्केट, कळस येथील कुरूंजाई ओटा मार्केट,
धानोरी ओटा मार्केट
या ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार भरविण्यात येणार आहे.

अधिक वाचा  TNPL: एका चेंडूत ८ धावा; तिरुपूरच्या गोलंदाजाच्या ऐतिहासिक चुकांमुळे जिंकलेली मॅच हरले

बांधीव ओटा मार्केट कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या संस्थेमार्फत निवडलेल्या समुदाय आधारित संस्थाना (सीबीओ) व शेतकरी उत्पादक कंपनी यांना आठवड्यातील एक दिवसासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महापालिकेच्या हद्दीतील विविध ठिकाणच्या ठराविक मोकळ्या जागावर आठवडे बाजार भरविण्यासाठीचा प्रस्तावही महापालिकेकडे आला आहे.

“शेतकरी आठवडे बाजार उपक्रमाद्वारे नागरिकांना स्वच्छ, ताजी, विषमुक्त, फळे व भाजीपाला वाजवी दरात मिळणार आहे. तसेच शेतकरी बांधवाना शेतमाल विक्री करण्याकरिता हक्काची जागा अल्प दरात उपलब्ध होणार आहे. तरी नागरिकांनी महापालिकाच्या ओटा मार्केटमध्ये जाऊन फळे व भाजीपाला याची खरेदी करावी. तसेच या योजनेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उप आयुक्त,” असे आवाहन अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाचे कार्यकारी अभियंता आशित जाधव यांनी केले आहे.

अधिक वाचा  शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरे आणि शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक