लोकसभा आणि विधानसभेतील दुसऱ्या क्रमांकाच्या जागेवर येणाऱ्या निवडणुकीत लक्ष द्या, असे स्पष्ट आदेश शरद पवारांनी दिलेत. अशातच लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर ठरल्याची चर्चा सुरुय. दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं सुरुवातीला 20 जागांवर दावा करणारा ठाकरे गट दोन पऊलं मागं का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सुरुवातीला ठाकरे गटाकडून लोकसभेच्या वीस जागांवर दावा करण्यात आला होता. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमिवर मविआची एक बैठकही पार पडली. यावेळी लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच काँग्रेस या फॉर्म्युल्यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. पण राऊत लोकसभेच्या जागावाटपाबाबत मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले राऊत?
जागावाटपाबाबत अद्याप कोणताही फॉम्यूर्ला ठरलेला नाही. समान जागा वाटपाबाबतही काही ठरलेलं नाही. आम्ही 18 जागा लढवणार आहोत. आमचे 18 खासदार विजयी होतील. दादरा नगर हवेलीमधून देखील आमचा एक खासदार विजयी होईल. लोकसभेत आमचे 19 खासदार जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची 17 मे रोजी शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे समजते. त्यात गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार क्रमांक दोनवर होते, त्या जागांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्यात. याचा मोठा फटका शिवसेनेच्या ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. कारण 2019 मध्ये राज्यातल्या 288 विधासनसभा मतदारसंघात 48 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या नंबरची मते मिळाली.
लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत 48 मतदारसंघांपैकी 15 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला दोन नंबरची मते मिळाली होती. यातल्या 8 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट शिवसेनेसोबत सामना रंगला. त्यामुळे शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे चित्र सुद्धा बदलू शकते.