वारजे माळवाडी येथील मुंबई बंगलोर महामार्ग शेजारील पुणे मनपा चे सर्व्हिस रस्ते पूर्ण करून वाहतुकीस खुले करावेत या करिता खडकवासला मतदारसंघाचे आमदार श्री. भिमराव आण्णा तापकीर यांच्या नेतृत्वाखाली वारजे येथे घंटानाद आंदोलन आयोजन करण्यात आले. यावेळी या भागातील माजी नगरसेवक किरण बारट्टके, सचिन दांगट, वासुदेव भोसले, रोहिणीताई भोसले अनेक सोसायटी मधील पदाधिकारी, सभासद, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी पुणे मनपा पथ विभागाचे प्रमुख व्ही जी कुलकर्णी साहेब, सहायक आयुक्त राजेश गुर्रम साहेब, यांना निवेदन देण्यात आले.
वारजे माळवाडी भागातील वाढती लोकवस्ती लक्षात घेऊन या भागातील सर्व सेवा रस्ते पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्याची गरज असताना हे सुद्धा महापालिकेच्या वतीने याकडे दुर्लक्ष केले जात असून काही लोकांचा फायदा होण्यासाठीच या रस्त्यांची कामे केली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. चांदणी चौकाच्या दिशेकडून वारजेकडे येणारा वारजे हायवे लगत असणारा महापालिकेचा सेवा रस्ता ताब्यात घेवून पूर्ण करावा अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार तापकीर म्हणाले की, वारजे माळवाडी भागाचे वाढते नागरीकरण लक्षात घेऊन या भागातील नागरिकांना लागणाऱ्या प्राथमिक सुविधा पुरवण्याचे काम प्रशासनाचे असतानाही या भागामध्ये मात्र कायम काही लोकांनाच प्राधान्य देत नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचे काम केले जात आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देण्याची गरज असतानाही या भागामध्ये प्रशासनाच्या वतीने मुख्य सेवा रस्त्यांवरती अडवणूक करणाऱ्या लोकांचेचं लांगुणचालन करण्याचे प्रकार गैर असून याला आळा घालण्याची गरज आहे. कोणत्याही परिसराचा विकास हा सर्वांगीण आणि सर्वांच्या प्रयत्नाने होत असतो मी म्हणजेच सर्वकाही आणि काम म्हणजेच मीच केलं अशी भूमिका कोणी घेत असेल तर हा अहंमपणा असून यालाही आळा घालत परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी सर्वांवर आहे.
ज्या लोकांनी सेवा रस्ते ताब्यात न देता आपले व्यवसाय रस्त्यांच्या जागेवरतीच उभे ठाकले आहेत त्यांच्यावर ती कारवाई केली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. पथ विभागप्रमुख श्री. व्ही जी कुलकर्णी यांनी लवकरात लवकर ताब्यात असणारा रस्ता करून जो रस्ता ताब्यात नाही त्यांचा मोबदला देऊन रस्ता तयार करू असे सांगितले.