राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये राज्य सरकार पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार आहे. त्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पदे मिळणार आहेत. अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

भाजपची प्रदेश कार्यकारणी ची बैठक आज (ता. 18) पुण्यात बालगंधर्व सभागृहात सुरू आहे. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी ही घोषणा केली. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यात येणार आहेत. या पदांवर भारतीय जनता पक्षाचे सव्वा लाख कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या पन्नास हजार कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे बूथ लेव्हलचे अध्यक्ष आणि मंडलाध्यक्षांना विशेष कार्यकारी अधिकारी करण्यात येणार, असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

अधिक वाचा  दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांची माहिती; म्हणाले, ज्यांनी हे केलंय… 

तर शिवसेनेच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना ही संधी देण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्य सरकार निवडणुकीची तयारी करीत असून कार्यकर्त्यांना या पदांवर संधी देण्यासाठी तातडीची योजना जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या पातळीवरच या नेमणुका होणार आहेत.

त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज लागणार नाही. त्यामुळे केवळ पंधरा दिवसात या नेमणुका होणार आहेत. त्या माध्यमातून दोन्ही पक्षाच्या सुमारे पावणे दोन लाख कार्यकर्त्यांना थेट विशेष कार्यकारी अधिकारी करण्यात येणार आहे. या माध्यमातून भाजपने आणि शिवसेने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.