बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याचं चित्र आहे. राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे बहीण-भाऊ साखर कारखान्याच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. बहीण-भावाच्या या लढतीकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यापूर्वी झालेल्या आणि त्यानंतर झालेल्या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनंजय मुंडे सतत विजयी होत गेले. आता वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे. या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र येणार असल्याचं दिसून येतंय.

अधिक वाचा  मर्जीतील ठेकेदारासाठी महाराष्ट्रात काम केल्याची सक्ती; राज्यातील एक ते दोन कंपन्या या निविदेसाठी पात्र ठरणार

स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी परळी तालुक्यात वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना स्थापन केला. याच कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली आहे. संचालकांच्या २१ जागांसाठी धनंजय मुंडे गटाकडून १० तर पंकजा मुंडे यांच्या गटाकडून ११ उमेदवार रिंगणात आहेत. लढत चुरशीची होईल, असं वाटत होतं.

परंतु हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. असं झालं तर पंकजा मुंडे वैद्यनाथ कारखान्याच्या पुन्हा अध्यक्ष होऊ शकतात. धनंजय मुंडे गटाकडून त्यांचे बंधू अजय मुंडे, वाल्मिक कराड हे तगडे नेते रिंगणात आहेत.

मुळात धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती, जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समिती, बाजार समिती, नगर पंचायत स्वतःच्या ताब्यात ठेवल्या आहेत. याशिवाय ज्या पांगरी ग्रामपंचायतीमध्ये वैद्यनाथ कारखाना आहे, ही ग्रामपंचायतही वाल्मिक कराड यांच्यात ताब्यात आहेत. परळीमध्ये धनंजय यांनी पंकजांना सर्व बाजूंनी नामोहरम केलं आहे. वैद्यनाथ कारखान्यासाठीही धनंजय यांनी सर्व आखाडे तयार ठेवले होते. दोघांनी एकत्र येणं पंकजांसाठी फायद्याचं आहे. तर दुसरीकडे धनंजय यांना पुन्हा घर एकत्र आणण्याची संधी आहे, म्हणूनच ही खेळी खेळल्याचं बोललं जातंय.

अधिक वाचा  अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस पुण्यात सोसायटीत राडा; महिलांना केस ओढत मारहाण व्हिडिओ आता समोर