पिंपरी, पुणे – कंपन्यांनी वस्तू उत्पादन करताना ते पर्यावरण पूरक असावे या बाबतीत अधिक भर दिला पाहिजे. त्यातूनच सर्व सामान्य उपभोक्ता आणि राष्ट्र तसेच जागतिक पातळीवरील पर्यावरणाचे हित साधले जाईल, असे परखड मत पुणे मेट्रोचे मुख्य दक्षता अधिकारी आणि व्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) वतीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले व पेटंट मिळू शकतील असे प्रकल्प ‘क्षितिज २०२३’ प्रदर्शनात सादर करण्यात आले. यामध्ये ३३ प्रकल्प तर २०० हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदविला. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सोनवणे बोलत होते. यावेळी उद्योजक ओमप्रकाश पेठे, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. एन. बी. चोपडे, प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. नरेंद्र देवरे, रिसर्च अँड डेवलपमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. स्वाती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनात सादर केलेल्या ३३ प्रकल्पांमधून कॉम्प्युटर विभाग चार, आयटी दोन, इ ॲण्ड टीसी दोन तर मेकॅनिकल विभागातून दोन अशा दहा प्रकल्पांना विशेष प्रकल्प म्हणून गौरविण्यात आले.
डॉ. सोनवणे म्हणाले की, विज्ञान, तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. सर्व सामान्यांचे आणि उपभोक्त्याचे जगणे कसे सुसह्य होईल या दृष्टीने संशोधन होत आहे. अशा संशोधनाचा उपयोग उत्पादन करताना झाला पाहिजे. भारताची बाजारपेठ, उत्पादने याचा विचार करता नावीन्यपूर्ण कल्पना त्यावर आधारित संशोधन अशा बाबींवर कंपन्यांनी अधिक भर देण्याची गरज आहे. पीसीसीओई ने आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यार्थी आणि कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा प्रत्यक्ष संवाद होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल तर कंपन्यांना नावीन्यपूर्ण कल्पना, संशोधन पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
‘क्षितिज २०२३’ प्रदर्शनात ३३ प्रकल्प तर दोनशे कंपन्या सहभागी झाल्या आहेत. २८ प्रकल्पांचे पेटंट नोंदणी झाली असून त्याबाबतची पुढील प्रक्रिया देखील सुरू झाली आहे असे डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.
प्रास्ताविक डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अंजली श्रीवास्तव यांनी तर आभार डॉ. रजनी पी. के. यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. एन. बी. चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन केले गेले. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील विविध विद्या शाखांचे विभाग प्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.