गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू होती. डीके शिवकुमार की सिद्धरामैया यापैकी कोण कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार, याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती समोर आली आहे. तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील.
कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर अनेक सूत्र हलवण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आधीच दिल्लीला पोहोचले. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मात्र तब्येतीचं कारण देत दिल्लीला येणं टाळलं. मी औषधं आणि इंजक्शन घेतली आहेत, त्यामुळे मी दिल्लीला जाऊ शकलो नाही, असं शिवकुमार यांनी दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
शिवकुमार सगळ्यात श्रीमंत आमदार
डीके शिवकुमार कर्नाटकचे सगळ्यात श्रीमंत आमदार आहेत. निवडणुकीवेळी फॉर्म भरताना शिवकुमार यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली होती. यानुसार त्यांच्याकडे एकूण 1,413 कोटी रुपये आहेत. यामध्ये बँक खाती, जमीन, बॉण्ड्स, प्लॉट, सोनं, हिऱ्यांचे दागिने यांचा समावेश आहे. याशिवाय शिवकुमार यांच्याकडे लक्झरी गाड्याही आहेत. शिवकुमार यांच्या नेटवर्थमध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये 68 टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवकुमार यांनी 2018 साली त्यांची संपत्ती 840 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं, तेव्हा 2013 च्या तुलनेत ही संपत्ती दुप्पट वाढली होती.