पुणे – पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी हा नवीन जिल्हा तयार करण्यात यावा अशी मागणी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी काल केली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच ही मागणी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु आहे.
आता एका वृत्तवाहिनीशी बोलताना लांडगे यांनी अशी मागणी नेमकी का केली याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.
लांडगेंच्या या मागणीनंतर अनेक प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या. “ही मागणी माझी वैयक्तिक आहे. मला वाटतं की शासनाच्या योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पुण्याची लोकसंख्या ऐशी लाखांच्या पुढे गेली आहे. जर विभाजन केलं, तर छोट्यामोठ्या गोष्टी लोकांपर्यंत लवकर पोहोचायला मदत होईल.” असं स्पष्ट मत यावेळी लांडगेंनी व्यक्त केलं.
विद्यार्थ्यांना दाखले, प्रमाणपत्र लवकर हवे असतात. योजना राबवण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीची यंत्रणा विभागली गेली, तर त्याचा फायदा नागरिकांचं होतो.जुन्नरच्या कोपऱ्यातील आदिवासी बांधवाला शासकीय यंत्रणेची गरज असेल तर ती लगेच पोहचली पाहिजे एवढाच माझा उद्देश आहे. तसेच शिवनेरी या नावालाही कोणीच विरोध करणार नाही असंही आमदार लांडगे यावेळी म्हणाले.
महेश लांडगेंनी नेमकी काय मागणी केली
आकुर्डीत देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ग. दि. मा. नाट्यगृहाचं उद्घाटन पार पडले. यावेळी कार्यक्रमात महेश लांडगेंनी पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली. पिंपरी-चिंचवड शहराच्या बाजूच्या भागाला शिवनेरी जिल्हा म्हणून नाव दिलं जावं. तसेच हे राजकीय विभाजन नसून फक्त जिल्ह्याचं विभाजन असेल असंही महेश लांडगे यांनी यावेळी स्पष्ट केले होते.