आर्यन खान ड्रग्स केसमध्ये सगळ्यात आधी केपी गोसावी याचं नाव समोर आलं होतं. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ऑफिसच्या आतमध्ये आर्यन खानसोबतची गोसावीची सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता त्याच केपी गोसावीला आर्यन खान प्रकरणी 25 कोटींचा खंडणी मागणारा प्रमुख आरोपी म्हणून मानलं जात आहे. आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी आर्यन खानसोबत सेल्फी घेतल्याचं गोसावीने एसआयटीला सांगितलं आहे. 2021 क्रूज ऑन ड्रग्समध्ये एनसीबीचा स्वतंत्र साक्षीदार केपी गोसावी याने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कुटुंबाकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचा कट रचला, असा आरोप सीबीआयने केला आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार गोसावीने 2021 साली एनसीबी मुंबई क्षेत्राचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या मार्फत पैसे वसुली करण्याचा प्लान केला होता. या प्रकरणातला नंबर एक साक्षीदार प्रभाकर सेल याने वानखेडे आणि गोसावी यांनी आर्यन खानच्या कुटुंबाकडून मोठी रक्कम वसूल करण्याची योजना आखली होती असा आरोप केला, यानंतर एनसीबीने एसआयटीची स्थापना केली.
आर्यन खानकडे कोणतही ड्रग्स सापडलं नव्हतं, तरीही त्याला या प्रकरणात आरोपी करण्यात आलं आणि एनसीबीने त्याला अटक केली, असं तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलं आह. सीबीआयने आर्यन खान ड्रग्स ऑन क्रूज घटनेतल्या भ्रष्टाचार प्रकरणी समीर वानखेडे आणि अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने मुंबई, दिल्ली, रांची आणि कानपूरमधल्या 29 ठिकाणी छापे टाकले.
केपी गोसावी 9 स्वतंत्र साक्षिदारांपैकी एक आहे, ज्याची एनसीबीने चौकशी केली होती. एनसीबी कार्यालयातून आर्यन खानसोबतचा सेल्फी व्हायरल झाल्यानंतर त्याचं नाव पहिल्यांदा समोर आलं होतं. आर्यन खानची तपासणी करण्यात आली होती, पण त्याच्याकडे कोणतंही ड्रग्स सापडलं नव्हतं, पण त्याच्या फोनमध्ये ड्रग्स चॅट सापडले होते, असं गोसावीने एसआयटीला सांगितलं.
गोसावीला 2021 साली एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी अटकही करण्यात आली होती. या प्रकरणी पुण्याच्या चिन्मय देशमुख नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. गोसावीने मलेशियामध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून 3.09 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.