हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या अरोपाखाली अटकेत असलेले आरोपी डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ प्रदीप कुरुलकर यांना पुण्यातील विशेष एटीएस न्यायालयाने उद्यापर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज या प्रकरणात मोठी नवी अपडेट समोर आली आहे.
याप्रकरणात आज, १५ मे रोजी एक एअरफोर्स अधिकाऱ्याचे स्टेटमेंट कोर्टासमोर नोंद करून घेण्यात आले. महत्वाचे म्हणजे या, अधिकाऱ्यांला देखील फेसबुकवरून संपर्क साधत कुरुलकरांशी संपर्क साधण्यासाठी वापरला होता त्याच IP वरून कॉल देखील करण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे.
यानंतर प्रदीप कुरुलकरांसह वायुदलातील अधिकारीही पाकिस्तानच्या संपर्कात होता ही माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वायुदलातील अधिकारी निखील शेंडें हे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात होते असे एटीएसच्या तपासात समोर आले. ज्या आयपी अड्रेसवरून प्रदीप कुरुलकर यांच्याशी संपर्क साधला गेला, तोच आयपी अड्रेस बंगळूरू येथे तैनात शेंडे या वायुदलातील अधिकाऱ्याशी संपर्क करण्यासाठी वापरला गेला होता.
दरम्यान ही माहिती समोर आल्यानंतर वायुदलातील अधिकाऱ्याची एटीएसकडून चौकशी करण्यात आली . तसेच त्यांचा जबाब देखील नोंदवण्यात आला आहे. दरम्यान नौदलाकडून देखील या अधिकाऱ्याची स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे. मात्र या प्रकरामुळे प्रदीप कुरुलकर यांच्यासोबतच भारतीय सेनादलातील इतरही अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे.
प्रकरण काय आहे?
महाराष्ट्र एटीएसच्या पुणे युनिटने गेल्या आठवड्यात शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. ते हनीट्रॅपमध्ये अडकले असल्याचे महाराष्ट्र एटीएसच्या तपासात उघड झाले आहे की, कुरुलकर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलद्वारे एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होते, परंतु तिला कधीही भेटले नाहीत.
पण ते डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना भेटत असत. दरम्यान एटीएसला कुरुलकर आणि पाकिस्तानी गुप्तहेर यांच्या अनेक व्हॉट्सअॅप चॅट्स मिळाल्या आहेत.