कर्नाटकमध्ये काँग्रेसने सरकार स्थापनेच्या हालचारी सुरू केल्या आहेत. रविवारी संध्याकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बंगळुरूमध्ये बैठक झाली, यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मुख्यमंत्र्यांच्या पदावर निर्णय घेतील, असा ठराव झाला आहे.
दरम्यान, डी.के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्लीला जाणार असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. मात्र यावर आता काँग्रेस नेते आणि विधीमंडळ पक्षाच्या बैठकीचे केंद्रीय निरीक्षक सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले की, गरज पडल्यास दोघांनाही दिल्लीला बोलावले जाईल.
काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला आणि सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासह निरीक्षक दिल्लीला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या अहवालाबाबत काहीही सांगितले नाही. ते म्हणाले की आमचा अहवाल गुप्त आहे.
पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेच याबाबत खुलासा करू शकतात. काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत झालेल्या चर्चांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री निवडीसाठी खर्गे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिंदे, सरचिटणीस जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चुरशीची लढत आहे. या दोघांपैकी कोणाला मुख्यमंत्रिपदावर विराजमार करायचे हे खर्गे ठरवतील. कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाने रविवारी झालेल्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्याचा नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी अधिकृत करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. आवश्यकता भासल्यास शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला बोलावले जाईल. अशी माहिती शिंदे यांनी दिली.