छत्रपती संभाजीनगर : शिवसेना फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वृत्तवाहिन्यांवर मोठ्या त्वेशाने बोलत असतात. मात्र, समोरासमोर आल्यावर त्यांच्यात गप्पा होतात. लोकही या गप्पा एन्जॉय करतात, ते क्षण कॅमेऱ्यात टिपतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १४) टीव्ही सेंटर चौकातील पुतळ्याला अभिवादनासाठी आले होते.
त्यावेळी पालकमंत्री तथा रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी बऱ्याचवेळ गुफ्तगू केले. मात्र, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पाहताच, पालकमंत्र्यांनी कलटी मारल्याचे पहायला मिळाले!

जाधववाडी चौकातील बुलंद छावा युवा संघटनेच्या व्यासपीठावर पालकमंत्री संदीपान भुमरे चर्चा करत बसले होते. तेवढ्यात, अंबादास दानवे यांना भुमरे यांच्या शेजारची खुर्ची रिकामी करुन दिली. दानवे देखील भुमरेंच्या शेजारी बसले. वेळ मिळताच भुमरेंनी इशारा करत दानवेंशी बोलायला सुरवात केली. दानवेंच्या फेट्याच्या तुऱ्याच्या आडून भुमरेंनी बरेच हास्यविनोद केले. त्याला दानवेंनीही दाद दिली. बराचवेळ दोघात गुफ्तगू झाले.

अधिक वाचा  पुण्यात खळबळ! बहिणीच्या प्रियकराची सर्वांदेखत हत्या, भाऊ आणि आईनेच भाजी मंडईतच…

स्वागतानंतर शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रेत भुमरे आणि दानवे काहीवेळ चालल्यानंतर दानवेंना गराडा पडला. ते तिथेच बोलत बसले. बराचवेळ भुमरे ताटकळले. त्यानंतर दानवे वाहनात बसून टीव्ही सेंटर चौकातील व्यासपीठावर जाऊन बसले. बऱ्याचवेळानंतर दानवेंची वाट पाहताना मागे पाहताच, माजी खासदार चंद्रकांत खैरे दिसले.
खैरेंना पाहताच, भुमरेंनी अभिजीत देशमुख यांच्या कानात काहीतर सांगत तिथून कलटी मारली. शोभायात्रा पुतळ्याजवळ पोचल्यानंतर खैरेंना अभिवादनासाठी बोलवायला किशोर नागरे आले तर, थांब… त्याला जाऊ दे तिथून, म्हणत शेवटी खैरेंनीही भुमरेंच्या समोरासमोर येणे टाळले.