एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचं मोठं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. भाजपला हरवण्यासाठी आम्ही कसलीही कुर्बानी देण्यासाठी तयार आहोत, असं जलील म्हणाले आहेत. इम्तियाज जलील आज अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. इम्तियाज जलील म्हणाले, “आम्ही महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्यास तयार आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल आम्ही ताकदवान आहोत, तर त्यांनी आमच्याकडे यावं.
खासदर असदुद्दीन ओवेसी यांचं नेतृत्व स्वीकारावं. तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ. भाजपला हरवण्यासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत, त्या लोकांसाठी आम्ही आमच्याकडून पाहिजे ती कुर्बानी देण्यासाठी तयार आहोत”, असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत. यावेळी इम्तियाज जलील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. याबरोबरच छत्रपती संभाजीनगर येथे दंगल झाली, त्यादिवशी वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठे होते आणि काय करत होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचं वक्तव्य जलील यांनी केलं. आता यावर महाविकास आघाडी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.