दौंड तालुक्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवायला घेतलेले कर्नाटकचे माजी मंत्री मुरगेश निराणी हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत असलेले निराणी यांचा भीमा पाटसमुळे दौंडशी संबंध आल्याने त्यांच्या निकालाची दौंड तालुक्यात उत्सुकता होती. निराणी पराभूत झाल्याने दौंडमध्ये महाविकास आघाडीत आनंदाचे, तर दौंड भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. निराणी हे बेळगी (जि. बागलकोट) मतदारसंघातून निवडणूक रिंगणात होते. तीन पंचवार्षिकमध्ये ते आमदार होते. साखर कारखानदारीतील मोठा अनुभव आणि राज्याच्या राजकारणात मोठा दबादबा असल्याने भाजपने त्यांना मंत्रिपद दिले होते. कर्नाटक राज्याचे राजकारण व समाजकारणातील त्यांचा अनुभव पाहता ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, काँग्रेसचे जे. टी. पाटील यांनी त्यांचा मोठा पराभव केला आहे.

अधिक वाचा  दिल्लीकर चाखणार कोकणातील हापूसची चव, आंबा महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

कर्नाटकचे उद्योगमंत्री म्हणून नजरेत भरणारे काम करूनही बेळगी शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने निराणी यांचा पराभव झाल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीत धर्मनिरेपक्ष जनता दलातर्फे रूकमोद्दीन सौदागर, तर ‘आप’ कडून मुथप्पा कोमार रिंगणात होते. बागलकोटच्या ग्रामीण भागात साखर कारखान्यांच्या माध्यमातून निराणी यांनी शेतकऱ्यांसाठी उपयोगी धोरण आखले होते. उद्योगमंत्री म्हणून काम केले असले तरी मतदारसंघात दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांचे विरोधक करत होते. विकासकामांसाठी त्यांनी सरकारी निधीची कधी वाट पाहिली नव्हती. अनेकदा त्यांनी स्वखर्चातून लोकांना मदत केली आहे. मागेल त्याला काम व मागणी प्रमाणे विकास काम हे तत्व निराणी यांनी अवलंबले असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात.

अधिक वाचा  तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मला खूप आनंद…’ आत्ता कट रचणारा आमच्या ताब्यात

भीमा-पाटस साखर कारखाना भाडेतत्वावर चालवायला देण्यासाठी तीन वेळा खुली निविदा काढण्यात आली. मात्र, कोणीही टेंडर भरले नव्हते. कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे भीमा-पाटस कारखान्यासाठी शब्द टाकला होता.

अमित शहा यांच्या मध्यस्थीने मुरगेश निराणी यांनी भीमा पाटसचे टेंडर भरले. कायद्याच्या चौकटीतील सर्व अटी शर्तींची निराणी पुर्तता करू शकत असल्याने त्यांना भीमा पाटस भाडेतत्वावर चालवायला मिळाला. तेव्हापासून दौंड तालुक्याला निराणी परिचित झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या निकालाची कालपासून चर्चा चालू आहे. निराणी यांच्या पराभवाची विशेषतः कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. कामगार कार्यकर्ते संभाजी देशमुख म्हणाले, ”निराणी यांच्यामुळे कामगारांची चूल पुन्हा पेटली आहे. निराणी यांच्या आनंदात आम्हाला सहभागी व्हायचे होते. विजयानंतर जल्लोष करण्यासाठी भीमा पाटसच्या कामगारांनी फटाके, गुलाल आणला होता. मात्र अनपेक्षित पराभव झाल्याने कामगार नाराज झाले आहेत.

अधिक वाचा  ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?