कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. कर्नाटकात काँग्रेसनं बाजी मारली असून भाजपचा राज्यातून सफाया केला आहे. या विजयानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाची लाट असतानाच, त्यांच्यात या विजयाचं श्रेय वाटून घेण्यासाठी चढाओढही सुरू आहे. काँग्रेसच्या या विजयात अनेक वाटकेरी आहेत. ज्यांच्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा भारताच्या दक्षिणेकडील राज्यांत परतली आहे. काँग्रेसच्या विजयाच्या मानकऱ्यांबाबत बोलायचं झालं तर अनेक नावं समोर येतात. राहुल गांधी यांच्यापासून ते मल्लिकार्जुन खर्गे आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यापर्यंत, काँग्रेसच्या विजय अनेक नावांमध्ये विभागला जाऊ शकतो, परंतु या सर्वांमध्ये एक नाव आणि चेहरा आहे, ज्याच्या बाजूनं सर्व एकमतानं उभे राहतील. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयासाठी रणनीती बनवणाऱ्या आणि या निकालाची पटकथा लिहिणारं ते नाव म्हणजे सुनील कानुगोलू.
काँग्रेसचे मुख्य रणनीतिकार
सुनील कानुगोलू ही अशी व्यक्ती आहे जी कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रमुख रणनीतीकारांपैकी एक आहेत. संपूर्ण निवडणुकीदरम्यान, त्यांनी जनतेशी विस्तृत आणि तपशीलवार संपर्क साधला. त्यासाठी त्यांनी रणनिती आखली. भाजपची निवडणूक भाषणं आणि अजेंड्याला छेद देत त्यांनी भ्रष्टाचार, गैरकारभाराच्या आरोपात अडकलेल्या भाजपशासित सरकारचा पर्दाफाश केला. विधानसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या यशाचं संपूर्ण श्रेय काँग्रेस कार्यकर्त्यांना जातं, पण प्रचाराच्या नवनवीन पद्धती शोधून काढणं, लोकांची नाडी जाणून घेण्यासाठी वेगवेगळी सर्वेक्षणं करणं आणि त्याद्वारे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रणनिती आखणं ही जबाबदारी सुनील कानुगोलू यांच्या खांद्यावर होती. काल जाहीर झाल्यालेल्या निकालांवरुन ते स्पष्ट झालं की, त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
गेल्या वर्षी मार्चमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश
गेल्या वर्षी मार्चमध्ये काँग्रेसनं सुनील कानुगोलू यांना निवडणूक रणनितीकार म्हणून पक्षात स्थान दिलं होतं. काँग्रेसनं गेल्या वर्षी मे महिन्यात 2024 साठी टास्क फोर्सची स्थापना केली होती. यामध्ये निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलू यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. सुनील कानुगोलू यांनी यापूर्वी डीएमके, एआयएडीएमके आणि भाजपसोबतही काम केलं आहे. त्यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपसाठी, 2019 च्या संसदीय निवडणुकीत DMK आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये AIADMK साठी निवडणूक रणनिती तयार केली. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अनुपस्थितीत त्यांनी AIADMK साठी रणनिती आखली आणि पक्षानं चमकदार कामगिरी केली, तसेच पक्षाच्या रणनितीला चालना देण्याचं श्रेय त्यांना जातं.
सुनील कानुगोलू यांनी 2014 च्या आधी प्रशांत किशोर यांच्यासोबतही काम केलं होतं. मॅकिन्से यांचे पूर्व सल्लागार सुनील कानुगोलू हे 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख घटक होते आणि त्यांनी भाजपच्या असोसिएशन ऑफ बिलियन माइंड्सचे प्रमुख म्हणून काम केलं आहे. त्यांनी एबीएमचं नेतृत्व केलं आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधील भाजपच्या निवडणूक प्रचारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या सर्व निवडणुकांमध्ये भाजप जिंकला किंवा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.
भारत जोडो यात्रेच्या प्लानिंगमध्येही सुनील कानुगोलू यांचा मोठा वाटा
मूळचे कर्नाटकचे असूनही सुनील हे चेन्नईत लहानाचे मोठे झाले. साधीभोळी व्यक्तिरेखा असूनही सुनील राजकीय क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय आहेत. गेल्या वर्षी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि रणनिती आखण्यास सुरुवात केली. राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेचं श्रेयही त्यांनाच जातं. विशेष म्हणजे, कर्नाटकातील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपसोबत काम केलं होतं. त्यावेळीही सुनील यांनी पक्षाला विजय मिळवून दिला होता.
हा असेल सुनील यांचा पुढचा प्रकल्प
तेलंगणातही काँग्रेसची सत्ता आणून देण्याचं काम सुनील यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमधील आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान पक्षासमोर आहे, त्याची जबाबदारीही सुनील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयापर्यंत नेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, काँग्रेसला बळकट करणं आणि विजय मिळवणं याचा समावेश त्यांच्या भविष्यातील प्रमुख कामांमध्ये आहे.