मुंबई: IRS अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या काही सहकार्यांना आर्यन खान प्रकरण चांगलंच भोवल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात खंडणी मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने समीर वानखेडे आणि इतर दोन अधिकाऱ्यांशी संबंधित देशभरातील 29 ठिकाणी छापेमारी केली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये घडलेल्या कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. आर्यन खान प्रकरणात 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आर्यन खान प्रकरणात खंडणी मागितल्याचा आरोप ठेवून समीर वानखेडे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह दोन अधिकारी आणि इतर दोन खासगी व्यक्तींच्या विरोधात हा गुन्हा नोंदवला आहे.

अधिक वाचा  पुणे पोलिसांना डॉ. घैसास पळून जाईल याची भीती घेतला ‘हा’ मोठा निर्णय?; रोज येथे हजेरी लावण्याचा सूचना

एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी आर्यन खानला या प्रकरणातून सोडण्यासाठी शाहरुख खानकडून पैसे मागितले होते असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर एक व्हिजीलन्स कमिटीकडून याची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर यामध्ये काही अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आणि काहीजणांची बदली करण्यात आली होती. आर्यन खान विरोधात कोणताही चार्ज न लावण्यासाठी किरण गोस्वामी याने 25 लाख रुपये घेतले होते आणि ते अधिकाऱ्यांना दिले असल्याचं यामध्ये समोर आलं.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि त्यामधील 50 लाख रुपये स्वीकारण्यात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिक वाचा  अमरावतीचं माझ्यावर कर्ज, जगाच्या नकाशावर शहराला मिळेल ओळख, विमानतळाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.

एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनच्या मोबाईलमधील व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबीचा आरोप होता. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टातही सादर केला होता.

अधिक वाचा  टेस्ला भारतात एन्ट्री पक्की! उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर पुढील आठवड्यात महाराष्ट्र या 2 शहरांत कार तयार?

आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह जवळपास 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. त्यानंतर आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली.

या प्रकरणात पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप नंतर करण्यात आला. प्रसिद्धी आणि पैशासाठी हे सर्व घडवण्यात आल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. आर्यन खान याला नंतर या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली.