राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैसवालने आज केएल राहुलचे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचे रेकॉर्ड उद्धवस्थ केले. त्याने अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक ठोकत आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा इतिहास आपल्या नावावर केला.
राजस्थानने केकेआरच्या 150 धावांचा पाठलाग करताना आपल्या डावाची सुरूवातच षटकाराने केली. केकेआरचा कर्णधार नितीश राणाने पहिले षटक टाकण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र यशस्वी जैसवालने त्याचे स्वागत षटकाराने केले. पहिल्या दोन चेंडूवर यशस्वीने दोन षटकार ठोकले. त्यानंतर दोन चौकार मारत केकेआरच्या कर्णधाराला चांगलेच धुतले. यशस्वी इथेच थांबला नाही तर त्याने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत पहिल्याच षटकात 26 धावा चोपल्या. यानंतर दुसऱ्या षटकात हर्षित राणाने जॉस बटरला बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला होता. मात्र याच षटकात शेवटच्या दोन चेंडूवर यशस्वी जैसावालने एक षटकार आणि एक चौकार ठोकला. तिसऱ्या षटकात संजू सॅमसनने सभ्यपणे पहिल्या चेंडूवर एक धाव करत जैसवालकडे स्ट्राईक दिले अन् आतशबाजी पाहण्यास सुरूवात केली.
तिसऱ्या षटकात जैसवालने मुंबईकर शार्दुल ठाकूरला सलग तीन चौकार मारत त्याचे दमदार स्वागत केले. मात्र शार्दुलला मारलेल्या तीन चौकारांच्या वेदना या केएल राहुलला झाल्या. कारण या चौकारांच्या हॅट्ट्रिकसोबतच यशस्वी जैसवालने केएल राहुलचे आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मोडला. केएल राहुलने हा विक्रम 14 चेंडूत केला होता. तर यशस्वी जैसवालने हा विक्रम 13 चेंडूतच केला. यशस्वी जैसवाल फक्त 13 चेंडूत 50 धावा ठोकून शांत बसला नाही. त्याने कर्णधार संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची तडाखेबाज भागीदारी रचली. यशस्वी जैसवालने 47 चेंडूत नाबाद 98 धावा चोपल्या. त्याला संजू सॅमसनने नाबाद 48 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी सामना 9 विकेट्स आणि तब्बल 41 चेंडू राखून जिंकला.