एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी गेल्या वर्षी जून महिन्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत बंड केलं. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटानं आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपसभापतींकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, उपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगितीची मागणी केली होती. आता आज(दि.११) १० च्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाकडून १६ आमदारांच्या अपात्रेवर निकाल दिला जाणार आहे.
या निकालाकडे राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निकालामुळे ठाकरे गट व शिंदे गटाची धाकधूक चांगलीच वाढलेली आहे. सगळीकडे या निकालाची धामधूम सूरु असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र यांचा कामाचा धडाका सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून १६ आमदारांच्या अपात्रतेवर दिल्या जाणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एवढ्या सर्व घडामोडी घडत असताना, मुख्यमंत्र्यांचा दुपारी नाशिक दौरा ठरला आहे. आमदार किशोर दराडे यांच्या मुलाच्या विवाहाला मुख्यमंत्री नाशिकच्या अंजनेरी येथे उपस्थिती लावणार असल्याची माहिती समोर येत आहे. ऐन राजकीय घडामोडीत मुख्यमंत्र्याच्या या नाशिक दौऱ्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गट व शिंदे गटाचा युक्तिवाद सुरु होता. जवळपास 9 महिने या सुरु राहिलेल्या प्रदीर्घ सुनावणी मागील महिन्यात पूर्ण झाली. यानंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता. न्यायालय १६ आमदारांच्या अपात्रतेवर आज निर्णय देणार आहे. याच धर्तीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच मुख्यमंत्री मात्र निश्ंचिंत असल्याचं समोर येत आहे. आता मुख्यमंत्री हा नाशिक दौरा करतात का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.