राज्याच्या सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. न्यायालयामध्ये गुरुवारी सकाळी अकरा वाजता निकालाचे वाचन होणार आहे. निकालाचे वाचन ज्यावेळी होईल तेव्हा त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. या वेळी निकालाचे वाचन नेमके कोण करणार? या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता आहे. निकाल फक्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड वाचून दाखवणार आहेत. त्यामुळे दोन वेगळ्या निकालांची किंवा घटनापीठात मतभेदांची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा निकाल एकमताने येणार असल्याचे सांगितले जात आहे. उद्याच्या न्यायालयाच्या कामकाजात महाराष्ट्राच्या प्रकरणाचा समावेश आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करत गुवाहाटी गाठले आणि तेथून महाराष्ट्रात परत येत सरकार स्थापन केले. दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. शिवसेना ठाकरे गटाने 16 आमदारांना व्हिप पाळला नाही, म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या आमदारांना नोटीस बजावली होती. त्या नोटिशीच्या विरोधात १६ आमदार सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
सुरुवातील 2 न्यायाधीशांच्या समोर आणि त्यानंतर माजी सरन्यायाधीश व्ही. एन. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे ११ जुलै २०२२ पासून सुनावणी झाली. याच खंडपीठाने हे प्रकरण पाच सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली न्या. हिमा कोहली, न्या. एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. पी नरसिंहा या पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्यात आले होते.
या घटनापीठाच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने सुनावणीला सुरुवात झाली होती. ता. १४ फेब्रुवारीपासून दोन्ही बाजूकडून युक्तीवाद करण्यास सुरूवात झाली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद १२ दिवस, ४८ तास झाला. यातील पहिले ३ दिवस प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचे की नाही यावर युक्तिवाद करण्यात आला. मात्र, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शिवसेनेची ही मागणी फेटाळून लावत पाच सदस्यीय खंडपीठापुढेच सुनावणी सुरू राहील, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर झालेल्या दिर्घ सुनावणीनंतर या प्रकरणातील निकाल न्यायालायने राखीव ठेवला होता. आता गुरुवारी या प्रकरणाचा निकाल येणार आहे.
घटनापीठातील न्यायामूर्तींचे जर निकालावर एकमत नसेल तर दोन निकालपत्र येतात. त्यातील जो निकाल बहुमताने असतो, तो निर्णय असतो. मात्र, घटनापीठामध्ये पाच न्यायामूर्ती असल्यामुळे काही निकालांमध्ये तीन विरुद्ध २ किंवा चार विरुद्ध १ असाही निकाल येवू शकतो. मात्र, महाराष्ट्राच्या प्रकरणात पाचही न्यायामूर्तींमध्ये एकमत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरन्यायाधीश हा निकाल वाचून दाखवणार आहेत.