बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे वाईन शॉप, बार अँड रेस्टॉरंट, क्लब तसेच एपीएमसी येथील केएसबीसीएल गोदामही बंद ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यासह कर्नाटक राज्याच्या सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावरील इतर राज्यांतील मद्यविक्रीची दुकानेही बंद ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चेकपोस्ट सुरू करण्याची सूचना केली होती. त्यामुळे अवैध मद्यतस्करी आणि पैशांची होणारी वाहतूक रोखण्यात पोलिसांना यश आले.
विशेषकरून गोवा राज्यातून बेळगावला होणारी दारूची वाहतूक रोखण्यासाठी कणकुंबी तपासणी नाक्यावर सर्व प्रकारच्या वाहनांची रात्रंदिवस तपासणी करण्यात आली. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात अधिकाऱ्यांना यश आले.
बुधवारी (ता. १०) विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर शनिवारी (ता. १३) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी नीतेश पाटील यांनी सोमवारी (ता. ८) सायंकाळी ५ पासून ते ११ मे रोजी सकाळपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारची मध्यवर्ती दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. त्याचबरोबर १३ रोजी मतमोजणी होणार असल्याने शुक्रवार (ता. १२) पासून ते रविवारी (ता. १४) सकाळपर्यंत मद्यविक्री दुकाने बंद राहणार आहेत.
दरम्यान, कर्नाटक राज्याच्या हद्दीपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि गोवा राज्यांतील मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचा आदेशही बजावण्यात आला आहे. या काळात सीमावर्ती भागातील परराज्यात जाऊन मद्याची खरेदी केली जाऊ शकते. त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे.