सूर्यकुमार यादवची ३५ चेंडूत ८३ धावांची धडाकेबाज खेळी त्याला नेहाल वडेराने दिलेली धावांची साथ आणि इशान किशनने केलेल्या ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने फाफ डू प्लेसिसच्या आरसीबीचा तब्बल २१ चेंडू आणि ६ विकेट्सने पराभव केला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. दुसरीकडे आरसीबीचा प्ले-ऑफचा मार्ग अधिकच कठीण झाला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससमोर २०० धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने धमाकेदार सुरूवात केली.

सलामीवर इशान किशन पहिल्या चेंडूपासूनच आरसीबीच्या गोलंदाजाच्या मागे लागला. इशान आणि रोहित शर्माने ४.४ षटकातच अर्धशतकी भागीदारी केली. इशान किशन आज चांगल्या लयीत दिसला. तो मोठी खेळी करेल, असं वाटत असताना वानिंदू हसरंगाने त्याला बाद केलं. किशनने २१ चेंडूत ४२ धावांची धडाकेबाज खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. किशननंतर हसरंगाने रोहित शर्माला सुद्धा बाद केलं. रोहितला केवळ ७ धावाच करता आल्या. दरम्यान, रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहाल वडेराने मुंबईचा डाव सावरला. दोघांनी सुरूवातीला सावध फलंदाजी केली.

अधिक वाचा  26/11 हल्ल्यात काँग्रेस अन् राष्ट्रवादीचा वाटा; भाजप नेत्याच्या गंभीर आरोपांवर अजितदादांचं सडेतोड उत्तर

मात्र, मैदानावर जम बसल्यानंतर दोघेही आरसीबीच्या गोलंदाजांवर तुटून पडले. सूर्याकुमार यादव तर वानखेडेवर चौकार आणि षटकारांची बरसात करत होता. त्याला वडेरा सुद्धा चांगली साथ देत होता. सूर्या आणि नेहालने तिसऱ्या विकेट्साठी तब्बल १४० धावांची भागीदारी केली. मुंबईला विजयासाठी अवघ्या ७ धावांची गरज असताना सूर्यकुमार यादव बाद झाला. त्याने ५३ चेंडूत ८३ धावांची विस्फोटक खेळी केली. त्याला विजयकुमारने बाद केलं. सूर्या बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर कॅमरून ग्रीन बाद झाला. मात्र, नेहाल वडेराने षटकार ठोकत मुंबईला सामना जिंकून दिला. वडेराने ३४ चेंडूत नाबाद ५२ धावांची सुंदर खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

अधिक वाचा  ‘तू मला रोखू शकत नाहीस,’ धोनीचा उल्लेख करताच अश्विनने पॅनलिस्टला केलं गप्प; म्हणाला ‘CSK च्या…’

आरसीबीकडून हसरंगा आणि विजयकुमारने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तत्पुर्वी आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर विजयासाठी २०० धावांचं लक्ष ठेवलं होतं. आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या ४१ चेंडूत ६५ धावा चोपल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने ६४ धावांची खेळी केली. याशिवाय दिनेश कार्तिकने १८ चेंडूत ३० धावा केल्या होत्या. या सामन्यात विराट कोहलीला चांगली कामगिरी करता आली नाही. कोहली केवळ १ धाव काढून बाद झाला. मुंबईकडून जेसन बेहरनडॉर्फ हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात ३६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय कॅमरून ग्रीन, ख्रिस जॉर्डन आणि कुमार कार्तिकेयने प्रत्येकी १-१ गड्यांना बाद केलं.

अधिक वाचा  महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला मोठी भेट; स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच हस्ते होणार लोकार्पण