विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त फलटण येथील आयोजित कार्यक्रमात रामराजेंना दिल्लीत पाठवण्याबाबत वक्तव्य करण्यात आलंय. या वक्तव्यानं आता साताऱ्यात भाकरी फिरवली जाण्याची शक्यता निर्माण झाली असुन जयंत पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना सातारा लोकसभेचा पुढील उमेदवारी रामराजेंनी करावी हा संदेश घेवुन मी आता मुंबईला जातोय असं सांगितलं. यामुळं आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उदयनराजेंच्या विरोधात रामराजे मैदानात दिसण्याची शक्यता असुन राष्ट्रवादीनं त्यांचा हुकमी एक्का बाहेर काढल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
काय म्हणाले अजित पवार?
महाराष्ट्राच्या विकासामध्ये नाईक निंबाळकर घराण्याचे योगदान मोठं आहे. बारामतीच्या परिसरात पवारसाहेब यांचे नेतृत्व आलं. त्यानंतर बारामतीचा विकास सुरू झाला. कोणत्याही तालुक्यात एक नेतृत्व आल्याशिवाय भागाचा विकास होत नाही. रामराजे आल्यानंतर या भागाचा विकास सुरू झाला. जनता ज्यावेळी मजबूतीने नेत्याच्या मागे उभे रहातात. त्यावेळी उत्तम पध्दतीने भागात कामे होतात. कृष्णा खोरेसाठी आम्ही आमदार म्हणून पाठींबा दिला, त्यावेळी कोणी 50 खोके एकदम ओके कोणी म्हटलं नाही. त्यावेळचे राज्यपाल फजल साहेब यांना नाईक निंबाळकर, मी, जयंत पाटील यांनी सांगितले. या भागात प्रचंड पाण्याचे दुर्भिक्ष्य झालं आहे. मग ते चला म्हटले. मग आम्ही हेलिकॉप्टरने निघालो. मग हे हेलिकॉप्टर धरणात उतरलं. कारण धरणात पाणीच नव्हते. मग त्यांनी अनुशेषचा मुद्दा बाजूला ठेवून निधी दिला.
जर इच्छा शक्ती असेल तर काहीही करता येत. एकीकडे जावई विधानसभा अध्यक्ष दुसरीकडे सासरे विधानपरिषदेचे अध्यक्ष असं कधी झाले नाही. नाईक निंबाळकर यांनी सगळं बघितले आहे. आत्ता त्यांनी लोकसभा पाहावी. प्रदेशाध्यक्ष यांनी सूचना मांडली, मी त्याला विरोधी पक्षनेता म्हणून अनुमोदन देतो, असं म्हणते अजित पवार यांनी एकप्रकारे उमेदवारी घोषित केली आहे. आम्ही दोघांनी याला सहमती दर्शवली आहे, त्यामुळे पवार साहेब हे नाकारतील असं वाटत नाही, असंही पवार म्हणाले. पण, जर निंबाळकर यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली तर पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील यांचा पत्ता कापणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
जयंत पाटील यांच्यानंतर अजित पवार यांनी देखील रामराजे नाईक निंबाळकर यांना लोकसभा निवडणुक लढविण्या संदर्भात विनंती केली. धमक असेल तर काहीही करता येत. पण आत्ताचे नेतृत्व या गोष्टींकडे लक्ष द्यायला तयार नाही. सुसंस्कृत महाराष्ट्रत गालबोट लावण्याचे काम काही नेते करत आहेत. काही प्रवक्ते हे काम करत आहेत. संस्कृती सोडून राष्ट्रीय पातळीवरील नेत्यावर टीका करत असल्याची टीका अजित पवारांनी केली.