मुंबई: ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगरपालिकेतील राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेला शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता आणि उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक म्हणून विश्वनाथ महाडेश्वर ओळखले जात होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात एक तरुण कार्यकर्ता म्हणून विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात पेशाने शिक्षक असलेले विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेत एक-एक पायरी वर चढत महापौरपदी विराजमान झाले. मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या काळात विश्वनाथ महाडेश्वर मुंबईचे महापौर होते. एक साधा प्राध्यापक, शिवसैनिक, नगरसेवक ते महापौर हा विश्वनाथ महाडेश्वर यांचा प्रवास अत्यंत रंजक आहे.

अधिक वाचा  बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, औद्योगिक विकासालाही चालना मिळण्यास मदत; पालकमंत्री अजित पवारांचा तरुणांसाठी मोठा निर्णय

महापौरपदाच्या काळात विश्वनाथ महाडेश्वर हे दैनंदिन जीवनात मराठी भाषेच्या वापरासाठी कायम आग्रही राहिले. महापौर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना विश्वनाथ महाडेश्वर फक्त मराठी भाषेतच संवाद साधायचे. मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांना प्रोत्साहन देणे आणि पालिकेच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढावा, यासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांनी विशेष प्रयत्न केले.

विश्वनाथ महाडेश्वर हे घाटकोपरच्या पंतनगर परिसरातील राजे शिवाजी हायस्कूलमध्ये प्राध्यापक होते. १९९२ च्या दंगलीमध्ये शाखाप्रमुख असल्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला. त्यामुळे शैक्षणिक संस्थेकडून शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना राजे शिवाजी हायस्कूल पंतनगर घाटकोपर इथून काढण्यात आले. शिवसैनिक झाल्यानंतरही ते प्राध्यापक असल्याची आपली जबाबदारी विसरले नाहीत. विश्वनाथ महाडेश्वरांनी १९९३ साली प्रथम आपल्या विभागात स्वतः क्लास घेण्यास सुरुवात केली. आपल्या विभागातील परिस्थिती पाहता त्यांनी राजे संभाजी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज सांताक्रुजमध्ये सुरू केले. विभागातील गरिबी पाहता त्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषिक शाळेची प्रबोधन शिक्षण संस्था सुरू करत सिक्रेट माईन हायस्कूलची स्थापना केली. एकीकडे आपली प्राध्यापकाची जबाबदारी दुसरीकडे शिवसेनेने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत राहिले.

अधिक वाचा  पुण्यात भाजप VS काँग्रेस यांच्यात राडा, भाजपचे आंदोलक प्रचंड आक्रमक; पोलिसांनी केलं स्थानबद्ध

विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबई महानगरपालिकेतील राजकीय कारकीर्द

विश्वनाथ महाडेश्वर यांनी नव्वदीच्या दशकात शिवसेनेसाठी काम करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात प्रभावी कामगिरी केल्यामुळे ते लगेचच शाखाप्रमुख झाले. यानंतरच्या काळात ते जवळपास १० वर्षे शिवसेनेसाठी काम करत राहिले. २००२ साली विश्वनाथ महाडेश्वर पहिल्यांदा नगरसेवक झाले. शिक्षकी पेशाची पार्श्वभूमी असल्यामुळे २००३ मध्ये महाडेश्वर यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. २००७ आणि २०१२ साली ते पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१७ मध्ये नगरसेवकपदाच्या तिसऱ्या टर्ममध्ये विश्वनाथ महाडेश्वर यांना मुंबईचा महापौर होण्याचा मान मिळाला. यानंतर २०१९ मध्ये विश्वनाथ महाडेश्वर यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठीही नशीब आजमावून पाहिले. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेच्याच तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षाची मतं मोठ्याप्रमाणात फुटली. याची परिणती विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पराभवात झाली. त्यामुळे काँग्रेसचे झिशान सिद्दिकी हे निवडून आले.

अधिक वाचा  बीड जिल्हा रुग्णालयात भयंकर परिस्थिती, प्रसुतीवेळी तीन महिलांचा मृत्यू, डॉक्टरांना वाचवण्यासाठी राजकीय धडपड?