पुणे : देशातील संवेदनशील माहिती पुरविणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वरिष्ठ शास्त्रज्ञाकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक संचाचे ‘रॉ’ गुप्तचर यंत्रणेने तांत्रिक विश्लेषण सुरू केले आहे. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दिल्ली येथील ‘डीआरडीओ’च्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याबाबत संशय आल्यानंतर चौकशी केली. तसेच, त्याच्या ताब्यातून लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त केले होते. या चौकशीत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या न्यायवैद्यक तपासणीत डॉ. कुरुलकर याने पाकिस्तानी हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याचे समोर आले होते.
त्यानंतर ‘डीआरडीओ’च्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविले. मुंबई एटीएसने डॉ. कुरुलकर याला अटक केली. न्यायालयाने डॉ. कुरुलकर याला येत्या मंगळवारपर्यंत (ता.९) एटीएस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (रॉ) गुप्तचर यंत्रणेनेही डॉ. कुरुलकर याची चौकशी सुरू केली आहे.
डॉ. कुरुलकर हे सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हस्तकांच्या संपर्कात होते. ते परदेशात पाकिस्तानी गुप्तचरांना भेटल्याचेही समोर आले आहे. ते पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये कसे अडकले, तसेच त्यांनी पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला (पीआयओ) कोणती माहिती दिली. तसेच, ते देशात आणखी कोणाच्या संपर्कात होते, याबाबत तपास करण्यात येत आहे.