शिंदे गटाचे अनेक नेतेमंडळी त्यांची विधानं,आक्रमक स्वभाव, प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी यामुळे अनेकदा अडचणीत आले आहेत. आता पुन्हा एकदा शिंदे गटाच्या आमदाराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते व आमदार भरत गोगावले यांच्या भावाने व पुतण्याने भररस्त्यात उपसरपंच व त्यांच्या वडिलांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महाड तालुक्यातील पिंपळवाडी गावातील उपसरपंचावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार महाड पोलिसांत दाखल झाली आहे. यावेळी मारहाण करणाऱ्यांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही उपसरपंच आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यावेळी केला आहे. याप्रकरणी रात्री पोलीस महाड पोलिसांत आता तक्रार दाखल झाली आहे.
पिंपळवाडीचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी काही मुद्द्यांवरुन ग्रामपंचायतीतील कारभाराबाबत सवाल उपस्थित केले होते. याच मुद्द्यावरुन आमदार भरत गोगावले यांचे भाऊ महेश गोगावले आणि पुतण्या चंद्रकांत गोगावले यांनी याच मुद्द्यावरून उपसरपंच कल्पेश पांगारे आणि त्यांच्या वडिलांना भररस्त्यात मारहाण केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. या मारहाणीत उपसरपंच पांगारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आरोप काय?
याबाबत उपसंरपंचाचे वडील बाबू पांगारे म्हणाले, काल गावात जत्रेचा कार्यक्रम होता.. जत्रा संपवून लोकं घरी चालली होती. त्यावेळी मी दुधाणेवाडीच्या बस स्टॉपला मी गेलो. त्यावेळी महेश गोगावले याने मला रस्त्यात अडवलं आणि धमकी देत म्हणाला की, तुमच्या मुलाला समजवा नाही तर मी त्याला रस्त्यात तुडवेन. तेव्हा मी त्याला म्हटलं की, रस्त्यात तुडवण्यापेक्षा आता तुडव.. त्यावेळी मला चंद्रकांत गोगावलेने पकडला आणि मला रस्त्यात खाली पाडून मला मारलं. त्यानंतर त्यांनी मला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये माझ्या डोक्याला दुखापत झाली.
माझ्या आईला देखील मारहाण
कल्पेश पांगारे यांनी देखील गोगावलेंवर गंभीर आरोप केले आहते. ते म्हणाले, सर्व आरोपींनी माझ्या आईला देखील मारहाण केली. तिचाही त्यांनी गळा दाबला. ते तिच्यावर देखील ते धावून गेले. त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची देखील धमकी दिली आहे.
भरत गोगावले काय म्हणाले?
या प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, ‘जो काही प्रकार झाला तो दुर्दैवी आहे. असं व्हायला नको हवं होतं. पण झालेल्या प्रकाराबाबत मी स्वत: लक्ष घातलं असून ते प्रकरण गावाच्या पातळीवर मिटवलं जाईल. आमच्या गावांमध्ये असे प्रकार होत नाही. त्यामुळे हे प्रकरण गावातच सोडविण्यात येईल असंही आमदार भरत गोगावले यावेळी म्हणाले.