राजापूर रिफायनरीसाठी सर्वेक्षणाला स्थानिकांकडून विरोध केला जात असून यामुळे वाद चिघळत चालला आहे. आज ठाकरे गटाचे नेते आणि प्रमुख उद्धव ठाकरे बारसूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना या प्रकल्पाच्या जागेसंबधी केंद्राला उद्धव ठाकरे यांनीच पत्र दिलं होतं त्यावरून त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘नाणार येथे प्रकल्प होऊ नये यासाठी तेथील ग्रामस्थांच्या मागणीला शिवसेनेने पाठिंबा दिला. त्यानंतर तो प्रकल्प तेथून घालवला. त्यावेळी माझी भूमिका स्पष्ट होती. प्रकल्पाला विरोध किंवा समर्थन असं आम्ही काही ठरवलं नाही. जे स्थानिक प्रकल्पाच स्वागत करतात तिथे तो उभारला जाऊ शकतो. त्याचवेळी आशिष देशमुख यांच्याही बातम्या आल्या होत्या. आशिष देशमुख म्हणाले होते प्रकल्प आमच्याकडे द्या तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं त्यासाठी पाणी लागतं, तेव्हा ते म्हणाले होते आम्ही बाकी पाहतो’.
‘त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो तेव्हा आता जे लोक सुपाऱ्या घेऊन फिरतात. त्या गद्दार लोकांनी मला असं सांगितलं की, हा बारसूचा प्रकल्प आता जिथे होणार अशा चर्चा आहेत. या प्रकल्पाला तिकडच्या लोकांचा विरोध नाही, तिकडे बरीच जमिन निर्मनुष्य आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही. हा प्रकल्प तिकडे आला तर चांगला प्रकल्प आपल्या राज्याला मिळेल. त्याचबरोबर जो तुमचा नाणार वेळचा आक्षेप होता पर्यावरणाची हानी होईन, स्थानिकांचा विरोध येथे होणार नाही. त्यामुळे मी ते पत्र केंद्र सरकारला दिलं होतं असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. आता केंद्राला दिलेल्या या पत्रावरून सत्ताधारी लोक राजकारण करतात. स्थानिकांचा विरोध असेल तर आम्हीही त्याचा विरोध करू असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत.
प्रकल्पावरुन माघार घेतली नाही तर सरकार पडणार ; उद्धव ठाकरेंना विश्वास!
मुख्यमंत्री असताना ठाकरेंनीच बारसूची जागा सुचवली होती अशी माहिती समोर आली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहाल होतं. 12 जानेवारी 2022 रोजी ही पत्र लिहण्यात आलं होतं. बारसूमध्ये 13 हजार एकर जमीन राज्य सरकार उपलब्ध करून देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दर्शवली होती. त्याचबरोबर याठिकाणची बहुतांश जमीन ही ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.