राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखून यापुढील काळात पक्षाचे अध्यक्षपदावर राहणार असल्याचे स्पष्ट केले. पवार यांनी हा निर्णय शुक्रवारी (ता. ५) पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. त्यावेळी त्यांच्याभोवती पक्षातील तरुण पदाधिकारी बसले होते. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार हे अनुपस्थित होते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले. यावर प्रश्न विचारताच शरद पवार यांनी सर्वांनीच उपस्थित राहणे गरजेचे नसते, असे उत्तर दिले. शरद पवार म्हणाले, सकाळपासून झालेल्या सर्व चर्चांत ते सहभागी होते. पक्षातील सर्व नेत्यांनी मिळून अध्यक्षपदाचा ठराव मंजूर केला. तो माझ्यापर्यंत पोहचण्याचे काम त्यांनी केले. आता कुणी असतील किंवा कुणी नसतील याची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पक्षातून कुणीही बाहेर जाणार नाही. जो कुणी तसा चर्चा करत असेल तर त्यांना जाऊन विचारा.

अधिक वाचा  पुणे पालिकेला फुले वाडा स्मारकासाठी फटकारल्यावर जाग; 3 महिन्यांत ८०१ मागण्या समजून अहवाल करण्याच्या सूचना

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार नॉट रिचेबलच्या चर्चांना उधाण आले होते. त्यात ते भाजपात जाणार असल्याच्याही अफवा पसरविण्यात आल्या. त्यात शरद पवार यांनी अध्यक्षपदाबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजितदादा गैरहजर होते. त्यामुळे राज्यात पुन्हा चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, अजित पवार यांनी ट्विट करून पवारसाहेबांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांचा निर्णय राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि महाविकास आघाडीची ताकद वाढवणार असल्याचे ट्विटमध्ये पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा पवारसाहेबांचा निर्णय कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा आहे. यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष राज्यात आणि देशात उज्जवल यश संपादन करेल. आता पवार साहेबांच्या वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन येणाऱ्या काळात सर्वांनी अधिक जबाबदारी उचलावी लागणार आहे. दरम्यान, शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवारांनी आपल्या राज्यातील दौऱ्याचीही घोषणा केली आहे. ते म्हणाले, “आदरणीय साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत. शुक्रवारी उशीरापर्यंत मुंबईत थांबल्यानंतर उद्यापासून दौऱ्यावर जाणार आहे.

अधिक वाचा  नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा तोडायला सुरुवात, पोलिसांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड

अजित पवार शनिवारपासून राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते

शनिवारी (ता. ६) दौंड, कर्जत दौऱ्यावर

रविवारी (ता. ७) बारामती,

सोमवारी (ता. ८) कोरेगाव, सातारा,

मंगळवारी (ता. ९) सातारा, फलटण,

बुधवारी (ता. १०) उस्मानाबाद, लातूर

गुरुवारी (ता. ११) नाशिक

शुक्रवारी (ता. १२) पुणे कार्यक्रमांस उपस्थित असणार आहेत.