ठाकरेंची पवारांकडून पुन्हा कोंडी! युतीसाठी फडणवीसांचे नेहमीच नमतं: ठाकरेंच्या पचनी?भारतीय जनता पक्षामुळेच युती तोडली गेली, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवर केला जातो. मात्र शिवसेना भाजप शिवसेना युती टिकवण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच प्रयत्न केले. सर्वात मोठा पक्ष होऊनही ते कमीपणा घेत शिवसेनेबाबतचं नातं मजबूत करण्याची धडपड करताना दिसत होते, असे निरीक्षण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नोंदवलेले आहे. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृ्त्तीत याबाबत २०१४ मधील राजकारणावर त्यांनी सविस्तर लिहले आहे.
युतीच्या संदर्भात पुस्तकात पवार म्हणतात, ‘फडणवीस यांनी युतीचं सरकार टिकवण्यासाठी आणि सरकारच्या स्थैर्यासाठी मातोश्रीवर दाखल होत, उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याबाबत प्रयत्न केले. सर्वात मोठा पक्ष ठरूनही कमीपणा घेऊन, शिवसेनेबरोबरचं नातं मजबूत राखण्यासाठी नेहमी प्रयत्न करताना दिसले. याचसोबत पक्षवाढीसाठी फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांचीही शरद पवारांनी प्रशंसा केली आहे. शिवसेनेसोबत असलेलं नातं टिकवत असतानाच ते दुसरीकडे पक्षाची ताकद वाढावत होते. भाजपची ताकद देवेंद्र फडणवीस वाढवत आहेत, हे शिवसेनेला थोड्या विलंबाने समजलं. खरं तर फडणवीस यांचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, त्यामुळे आम्ही सावध झालो होतो, असेही या पुस्तकात उल्लेख आहे.खरंतर २०१४ सालीच शिवसेनेला सोबत घेऊन, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार बनवायची योजना होती, आणि यासाठी शिवसेनेची ही तयारी होती, मात्र या प्रयोगात काँग्रेस पक्षाने याला मोडता घातला, असेही पुस्तकात सूचकपणे सांगितले आहे.
शरद पवार म्हणतात, भाजपा आणि शिवसेनेतली फारकत आणखीनच वाढत गेली तर काहीतरी घडवता येईल, असे स्पष्ट असूनही काँग्रेस पक्षाचं नेतृत्व यासाठी फारसं आग्रही नव्हतं. किंबहुना, एकूणच लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेसच्या मानसिकतेत एक बदल घडून आला होता. काँग्रेसी विचारांच्या बांधिलकीचा वारसा सांगणारे कमकुवत झाले, असा एकंदरीत तो बदल होता. त्यामुळेच महाराष्ट्रात जे काही होईल, ते ते हस्तक्षेपाविना पाहावं, असा पवित्रा काँग्रेस पक्षाने स्वीकारला होता.२०१४ सालची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीनं जर एकत्र येऊन लढवली असती, तर कदाचित राज्य जिंकता आलं ही असतं, असा आमचा विश्वास होता. १९८९ सालानंतर नंतर पहिल्यांदाच युती तोडून दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. परस्पर नात्यातल्या बदलांमुळे हे सरकार चाललं, मात्र या नात्यातली नैसर्गिक मैत्री आटलेली होती. हे काही आता लपून राहिलेलं नव्हतं, असाही उल्लेख या पुस्तकात केला आहे.